Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीदरम्यान राड्यात एकाची हत्या; सहा जणांना अटक, भांडूप पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2023 11:41 IST

भांडुप पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.

मुंबई : भांडुपमध्ये दारू पार्टीदरम्यान दोन गटात झालेल्या हाणामारीत एका तरुणाची हत्या आणि पाच जण जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे. भांडुप पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये पाच सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे. कल्पेश चव्हाण (२२) याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अनिकेत आंब्रे (३४), स्वप्निल आंब्रे (३७), विनीत राऊत (२६), गणेश कोलपाटे (३०), महेंद्र कोटियन उर्फ दूध (३०), नितेश दिगंबर परब उर्फ चिचो (२८) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यापैकी अनिकेत, स्वप्निल, विनीत, गणेशसह महेंद्र अभिलेखावरील आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. या हल्ल्यात सूरज भालेराव याचा मृत्यू झाला आहे. तर कल्पेशसह संग्राम जाधव, चेतन नाटेकर, आशिष वने, हृतिक शेलार हे जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. न्यायालयाने त्यांना २१ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

गुलाम हत्याकांड अन् राजकीय कनेक्शन

भांडुपमधील गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादाच्या लढाईतून घडलेल्या गुलाम हत्याकांडातील नाव जोडले गेलेला आरोपी गणेश कोलपाटे हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणातील आरोपी टोळीशी संबंधित आहे. तर गुन्ह्यातील अन्य एक आरोपी दूध हा गुलाम हत्याकांडातील अन्य आरोपींसोबत निर्दोषमुक्त झालेल्या विज्या बाबर याचा साथीदार आहे.  बाबर हा भांडुपमधील राजकीय पदाधिकाऱ्याच्या भावाचा पार्टनर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई