Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सामूहिक बलात्कार होत असताना पीडिता विरोध करेल अशी अपेक्षा करू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 04:01 IST

उच्च न्यायालयाने आरोपींची शिक्षा केली कायम; बचावपक्षाचा युक्तिवाद फेटाळला

मुंबई : एकटी मुलगी पाहून तिला बलात्काराच्या हेतूनेच उचलण्यात आले तर ती मुलगी विरोध करण्याऐवजी स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करेल, असे म्हणत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१२ मध्ये एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या दोघांची शिक्षा कायम केली.मुलीची या संबंधास संमती होती, हा बचावपक्षाचा युक्तिवाद फेटाळताना न्या. तानाजी नलावडे व न्या. किशोर सोनावणे यांच्या खंडपीठाने वरील निरीक्षण नोंदविले. सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला आरोपी अमोल ढाकणे (२९) आणि आत्माराम मुंडे (३०) यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. अमोल याला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची तर आत्माराम याला दहा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठाविली. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, पीडिता तिच्या बहीण आणि मेव्हण्याबरोबर शिवमंदिरात गेली होती. तेथून परतताना तिची बहीण व मेव्हणा त्यांची गावी निघाले व पीडिता तिच्या गावी निघाली. वाटेत तिला आपल्याकडे परतीच्या प्रवासासाठी असलेले सर्व पैसे खर्च झाल्याचे समजले. त्यामुळे उरलेल्या पैशातून अर्धा प्रवास केला. वाटेत उतरल्यावर आरोपींनी तिला जीपमधून तिच्या गावाला सोडण्याची तयारी दर्शविली. आरोपी ओळखीचे असल्याने व खिशात पैसे नसल्याने तिने आरोपीने देऊ केलेली मदत स्वीकारली. आरोपींनी आधी जीपमधील आरोपींना त्यांच्या गावी सोडले. त्यानंतर पीडितेला तिच्या गावी सोडेपर्यंत रात्र झाली. या संधीचा फायदा घेत त्या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर दोघांनी तिला रस्त्यावरच टाकले. पीडिता घरी न पोहचल्याने तिच्या वडिलांनी व मेव्हण्याने शोध सुरू केला. मध्यरात्री त्यांना ती गावाजवळील फाट्याजवळ दिसली. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली.सत्र न्यायालयाने या प्रकरणी अमोलला जन्मठेप तर आत्मारामला दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठाविली. या शिक्षेला दोघांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले, पीडिता व आरोपी एकमेकांना ओळखत होते. तिच्याच सहमतीने संबंध ठेवण्यात आले. त्यामुळे तिच्या शरीरावर एकही जखम नाही. मात्र न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळला.‘जीव धोक्यात घालण्याची अपेक्षा करणे अयोग्य’न्यायालयाने बचावपक्षाचा युक्तिवाद फेटाळताना म्हटले की, एखाद्या मुलीला बलात्कार करण्याच्या हेतूनेच रात्रीच्यावेळी उचलले, रस्त्यावर पुरेशी वाहतूक नाही की वर्दळ नाही, तिच्या जीवाला धोका असताना या वयातील मुलगी विरोध करण्याची शक्यताच नाही. अशावेळी तिला आपला जीव वाचविणेच महत्त्वाचे वाटेल. अशावेळी मुलीने स्वत:चा जीव धोक्यात घालावा आणि तिने या कृत्याला विरोध करावा, अशी अपेक्षा न्यायालय करू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने दोघांना सत्र न्यायालयाने ठोठाविलेली शिक्षा कायम केली.

टॅग्स :मुंबई हायकोर्टसामूहिक बलात्कार