Join us  

एकच कॉल... प्रॉब्लम सॉल्व्ह... मुंबईत अडकलेल्यांसाठी सोनूकडून 'टोल फ्री' नंबर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:12 PM

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले.

मुंबई - अभिनेता सोनू सूद याने मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत आणि मंजूर वर्गासाठी स्वतंत्र बससेवा सुरु करत, या स्थलांतरीतांना त्यांच्या गावी पोहोचवले आहे. आत्तापर्यंत १२०० पेक्षा जास्त लोकांची सोनू सूदच्या टीमने घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे, शेवटच्या प्रवासी, मजूरापर्यंत आम्ही हे काम सुरुच ठेवणार असल्याचे सोनुने म्हटले आहे. मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीने सोनू सूदकडून स्थलांतरीत नागरिकांना घरपोच करण्यात येत आहे. त्यासाठी, आता सोनू सूदने एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.  

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. तर, कामगार वर्गाकडून व सेलिब्रिटींकडूनही सोनू सूदचं कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बिहारमधील काही युवकांनी सोनू सूदचा पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ते पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरा असा रिप्लाय सोनूने दिला. आजपर्यंत ट्विटर अकाऊंटवर सोनूला टॅग करुन मदत मागितली जात होती. आता, सोनूने एक टोल फ्री नंबर जारी केला आहे. 

माझ्या प्रिय बंधु व भगिनींनो, जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुमच्या घरी जाऊ इच्छिता.  तर, कृपया या 18001213711 टोल फ्री नंबरवरुन आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही किती लोकं आहात, कुठे आहात व कुठे जाऊ इच्छिता याबाबत माहिती द्या. माझी टीम तुम्हाला शक्य ती सर्वच मदत करेल, असे सोनूने ट्विट केले आहे. सोनूच्या या कामाचं बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने कौतुक केलं असून एका युजरने सोनू सूद सिंघमवाला काम कर रहे है.. अशा शब्दात सोनूचं कौतुक केलंय.   

दरम्यान, सोनूच्या या कामाबद्दल राजकारण करत काहींन हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलंय. त्यास, सोनूने एका वृत्तवाहिनीशी बोलताना उत्तर दिलंय. ‘मला कुठल्याही पब्लिसिटीची गरज नाही. मी मदत करतोय ते मजूरांची. ज्यांच्या हाताला सध्या काम नाही. आई-वडील लहान लहान मुलांना घेऊन शेकडो किमी पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक. या वेदना मी कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मी कोणत्याही मीडिया पर्सनला बोलावले नाही. तुम्ही मजूरांची बस रवाना करा, तेव्हा आम्हाला बोलवा, असे अनेक मीडिया पर्सनचे मॅसेज मला येतात. पण मी अशा कुठल्याही प्रसिद्धीच्या फंदात पडलेलो नाही. घरी जाण्यासाठी रोज शेकडो कॉल व मॅसेज येत आहेत. मी एकटा हे सांभाळू शकत नाही. त्यामुळे मी एक टीम तयार केलीय, ती सगळे काम बघत आहे,’ असे सोनूने सांगितले.

टॅग्स :सोनू सूदस्थलांतरणकोरोना वायरस बातम्याउत्तर प्रदेशबिहार