One arrested from Delhi for black market injection of corona | कोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक

कोरोनासाठीच्या इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दिल्लीतून एकाला अटक

मुंबई : कोरोना उपचारादरम्यान रुग्णाच्या शरीरात आॅक्सिजनची पातळी कमी झाल्यावर वापरण्यात येणाऱ्या टोसिलिझुमॅब या इंजेक्शनचा काळाबाजार क्राइम ब्रँचच्या कक्ष ९ ने उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला दिल्लीतून अटक करण्यात आली. तपासाअंती इंजेक्शन्स बनावट असल्याचेही उघडकीस आले.

टोसिलिझुमॅबु हे इंजेक्शन दोन ते तीनपट अधिक दराने विकले जात असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या कक्ष ९ चे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार कक्षप्रमुख पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. टोसिलिझुमॅबसह अन्य संबंधित औषधांची मूळ कंपनी स्विर्त्झलँडमध्ये असून भारतात ही औषधे बनविण्याचा अधिकार असलेल्या कंपनीने याबाबत पोलिसांना दिलेल्या अहवालात औषधे बनावट असल्याचे कळविले. त्यानुसार पोलिसांनी तपासाअंती दिल्लीतून एकाला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै-२०२०च्या पहिल्या आठवड्यात त्याने गुढगावमधून काळ्याबाजारात ५८ हजार रुपयांना एक मूळ औषध विकत घेतले होते. त्यानंतर त्याचे हुबेहूब बॉक्स प्रिंट करून नंतर तशाच बाटल्या विकत घेऊन त्यात अस्थमासाठी वापरले जाणारे औषध मिसळून बनावट इंजेक्शन्स तयार केली. त्याची विक्री तिप्पट भावाने करीत असल्याची कबुली त्याने दिली.
कोविड चाचणी अहवालाशिवायच तो हे बनावट इंजेक्शन १ लाख रुपयांना विकत होता, असेही उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: One arrested from Delhi for black market injection of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.