वांद्रेत मोबाईलसाठी वृद्धाला चालत्या बसमधून ढकलले; चोराला खेरवाडी पोलिसांकडून अटक

By गौरी टेंबकर | Published: February 15, 2024 11:19 AM2024-02-15T11:19:36+5:302024-02-15T11:19:51+5:30

तक्रारदार काशीप्रसाद पांडे (६७) हे अंधेरी पूर्व च्या जे बी नगर परिसरात राहत असून सेवानिवृत्त आहेत.

Old man pushed from moving bus for cellphone in Bandra; The thief was arrested by the Kherwadi police | वांद्रेत मोबाईलसाठी वृद्धाला चालत्या बसमधून ढकलले; चोराला खेरवाडी पोलिसांकडून अटक

वांद्रेत मोबाईलसाठी वृद्धाला चालत्या बसमधून ढकलले; चोराला खेरवाडी पोलिसांकडून अटक

मुंबई: शहरामध्ये मोबाईल चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यासाठी हे चोर कोणत्याही थराला जात आहेत. वांद्रे पूर्व परिसरात देखील एका ६७ वर्षीय वृद्धाच्या खिशातून मोबाईल काढण्यासाठी त्याला चालत्या बस मधून ढकलण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी हनिफ शेख (२७) नामक चोरट्याला अटक केली आहे.

तक्रारदार काशीप्रसाद पांडे (६७) हे अंधेरी पूर्व च्या जे बी नगर परिसरात राहत असून सेवानिवृत्त आहेत. ते १३ फेब्रुवारी रोजी काही कामानिमित्त वांद्रे पूर्व च्या गांधीनगर या ठिकाणी गेले होते. तिथून त्यांनी मित्राची भेट घेत शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज समोरील बस स्टॉपवर जे बी नगरला जाणारी बस पकडली. त्यांच्या तक्रारीनुसार, ते बसमध्ये चढत असताना एक इसम त्यांच्या बाजूने गाडीत चढायचा प्रयत्न करत होता. तसेच त्याने पांडे यांच्या उजव्या खिशात हात घालून त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र पांडेनी त्याला प्रतिकार केल्याने त्याने त्यांना जोराचा धक्का मारला आणि पुन्हा त्यांचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पांडेनी फोन घट्ट धरून ठेवल्याने त्याला तो पळवता आला नाही.

या सगळ्यांमध्ये पांडे हे चालत्या बसमधून रस्त्यावर खाली पडले आणि त्यांच्या डोक्याच्या मागे जखम झाली. पांडे आणि चोरामध्ये सुरू असलेली खेचाखेची पाहून स्थानिकांनी त्याला पकडत चांगलाच चोप दिला. पुढे चोर आणि पांडे यांना निर्मलनगर पोलिसांकडे देण्यात आले. त्यांचे परिचित असलेले राजेंद्र साळवी यांना कोणीतरी फोन करून हा प्रकार कळवला. ज्यांनी निर्मलनगर पोलिसात धाव घेत पांडेना व्ही एन देसाई रुग्णालय आणि त्यानंतर जवळच्या प्रो स्कॅन डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपचारासाठी नेले. खेरवाडी पोलिसांनी पांडे यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला.  आरोपी शेख याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

Read in English

Web Title: Old man pushed from moving bus for cellphone in Bandra; The thief was arrested by the Kherwadi police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.