ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 05:52 IST2025-09-19T05:50:58+5:302025-09-19T05:52:22+5:30
हे नियम अॅपमध्ये १८ सप्टेंबरपासून लागू करण्याचे परिपत्रक मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी काढले आहे.

ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
मुंबई : अॅप आधारित कॅब सेवांचे भाडे परिवहन विभागाकडून निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार प्रति किमी २२.७२ रुपये ठरवण्यात आले आहे. मागणीच्या कालावधीत हे भाडे १.५ पट वाढवण्याची मुभा असेल तर, मागणी नसलेल्या काळात २५ टक्के कमी भाडे आकारावे लागणार आहे. तसेच प्रत्येक फेरीचे ८० टक्के भाडे चालकाला मिळणार आहे. हे नियम अॅपमध्ये १८ सप्टेंबरपासून लागू करण्याचे परिपत्रक मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी काढले आहे.
अॅप आधारित वाहतूक सेवेसाठी शासनाने धोरण तयार केले असून, ते अंतिम करण्याची कार्यवाही सुरू आहे. ते नियम अंतिम झाल्यास वाहनांच्या किमतीनुसार भाडेदर निश्चित करण्यात येणार आहे. धोरण लागू न झाल्याने अॅपआधारित टॅक्सी चालकांकडून वारंवार आंदोलन करण्यात येते. या सेवेचा रोज हजारो लोक वापर करीत असल्याने पुन्हा संप झाल्यास प्रवाशांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून धोरण अंतिम होईपर्यंत एमएमआरटीईच्या भाडेदराचा आधार धरून भाडे आकारणी करावी, असे सांगण्यात आले आहे.
प्रवाशांना पडू शकतो भुर्दंड
सध्या अॅपआधारित संस्थांकडून मागणीच्या वेळेत ४६ ते ४८ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त प्रति किमी भाडे आकारणी केली जाते, तर मागणी नसलेल्या काळात १० रुपयांपेक्षा कमी भाडे आकारणी होते; परंतु दर निश्चित केल्यावर प्रवाशांना मागणीच्या काळामध्ये ३४, तर मागणी नसलेल्या काळामध्ये १७रुपये प्रति किमी भाडे आकारणी होऊ शकते.
असे आहे भाडे
आणि त्यातली वाढ/ सवलत (१ किमीसाठी)
प्रती किमी भाडे (एसी कॅब) : २२.७२ रुपये
मागणीच्या काळामध्ये १.५ पट वाढ : ३४ रुपये
मागणी नसलेल्या काळामध्ये २५ टक्के सवलत : १७ रुपये