भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:52 IST2025-07-17T07:52:27+5:302025-07-17T07:52:42+5:30
ॲप आधारित वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी चालकांना सुरुवातीला जादा पैशांची प्रलोभने दिली; परंतु आता प्रतिकिमी कमी भाडे दिले जात आहे.

भाडे वाढवून मिळण्यासाठी ओला चालकांचा संप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई महानगरासह राज्यभरातील ॲप आधारित टॅक्सी सेवा पुरविणाऱ्या चालकांनी मंगळवारपासून संप पुकारला आहे. ॲप कंपन्यांकडून शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे प्रतिकिमी भाडे वाढवून मिळावे, अशी या चालकांची मागणी आहे. परिणामी, दररोज ॲप आधारित कॅब-रिक्षाने प्रवास करणाऱ्यांचा काहीअंशी खोळंबा झाला. रिक्षा आणि टॅक्सीप्रमाणे आमचे दरही निश्चित करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ॲप आधारित वाहतूक सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी चालकांना सुरुवातीला जादा पैशांची प्रलोभने दिली; परंतु आता प्रतिकिमी कमी भाडे दिले जात आहे. सद्य:स्थितीत रिक्षा व कॅब व्यवसाय संकटात असताना इंधन खर्च, वाहतूक खर्च आणि इतर दैनंदिन खर्च वाढल्याने अनेकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. अपुऱ्या उत्पन्नामुळे वाहनांचे हप्ते भरणेेही अनेकांना शक्य नाही. या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात शेकडो चालकांनी मंगळवारपासून संप सुरू केला. या संपामुळे प्रवाशांची मात्र खूप गैरसोय झाल्याचे चित्र आहे.
आरटीओने निश्चित केलेले दर सर्व ॲप आधारित सेवेसाठी लागू केले जावे. यापेक्षा कमी दर घ्यायचे असल्यास त्या कॅब ॲग्रीगेटर कंपन्यांनी स्वतःच्या खिशातून त्याची भरपाई करावी, तसेच जास्त दर घ्यायचे असल्यास, ही रक्कम ॲग्रीगेटर कंपन्यांनी स्वतः नफा म्हणून स्वीकारावी.
ओला, उबेर तसेच स्विगी, झोमॅटो यांसारख्या कंपन्यांच्या नफाधार्जिण्या धोरणामुळे कामगार त्रस्त आहेत. शासनाने अद्याप महाराष्ट्र ‘गिग’ वर्कर नोंदणी व सुरक्षा कायदा लागू न केल्यामुळे या कामगारांना न्याय्य मागण्यासाठी कोणतीही आयुधे नाहीत. त्यामुळे ॲप आधारित चालकांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे गिग कामगार नोंदणी व सुरक्षा कायदा लागू करण्याची गरज आहे.
केशव क्षीरसागर,
अध्यक्ष, महाराष्ट्र कामगार सभा