Oil companies decide to close cashback discount on fuel purchases by card | कार्डाने इंधन खरेदीवरील कॅशबॅक सवलत बंद करण्याचा तेल कंपन्यांचा निर्णय
कार्डाने इंधन खरेदीवरील कॅशबॅक सवलत बंद करण्याचा तेल कंपन्यांचा निर्णय

मुंबई : देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या आदेशाने तेल कंपन्यांनी सुरू केलेली कार्डावरील इंधन खरेदीवरील कॅशबॅक सवलत आता बंद करण्यात येत आहे. नोटाबंदीनंतर २०१७ च्या सुरुवातीस ही सवलत सुरू करण्यात आली होती.

‘एसबीआय कार्ड्स’ने आपल्या ग्राहकांना असा निर्णय घेतल्याबाबतचा एक संदेश पाठविला आहे. त्यात म्हटले आहे की, कार्ड पेमेंट करून भरण्यात येणाऱ्या इंधनावर देण्यात येत असलेली ०.७५ टक्के कॅशबॅकची सवलत १ ऑक्टोबर २०१९ पासून काढून घेण्यात येत असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी बँकांना कळविले आहे. इतर कार्ड पुरवठादार कंपन्याही यासंबंधीची घोषणा लवकरच करतील, असे सांगण्यात आले. ही सवलत तेल वितरक कंपन्यांकडून दिली जात होती. परंतु ग्राहकांना मिळणाºया कॅशबॅकचे क्रियान्वयन मात्र कार्ड पुरवठादार कंपन्या करीत होत्या.

कॅशबॅक सवलत बंद झाल्यानंतर मर्चंट डिस्काउंट कोणी सहन करायचे याबाबत अजून कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाही. यापुढे कार्ड वापरून पेट्रोल-डिझेल भरणे रोखीच्या तुलनेत महाग होणार का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. बँकांनी म्हटले की, याबाबतचा निर्णय सरकार आणि तेल वितरक कंपन्यांनी घ्यावयाचा आहे.

सूत्रांनी सांगितले की, तेल कंपन्यांच्या भागीदारीत संयुक्तरीत्या जारी झालेल्या कार्डांवरून यापुढेही कोणत्याही शुल्काशिवाय इंधन भरता येऊ शकेल. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. असे असतानाच तेल कंपन्यांनी ग्राहकांना दिला जात असलेला कॅशबॅक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

कच्च्या तेलाचे दर चढेच
सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत.
या हल्ल्यामुळे सौदी अरेबियाचे तेल उत्पादन अर्ध्यावर आले आहे. अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या हमीनंतर अमेरिकेकडून तेलपुरवठा वाढविला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Oil companies decide to close cashback discount on fuel purchases by card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.