बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 07:55 IST2025-12-23T07:54:47+5:302025-12-23T07:55:05+5:30
Western Railway Month Long Mega Block: पश्चिम रेल्वे ब्लॉक कालावधीत कांदिवली आणि बोरीवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जात आहेत.

बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: पश्चिम रेल्वेच्या कांदिवली - बोरिवली भागात सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी २१ डिसेंबरपासून ३० दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. परिणामी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुमारे १०० लोकल रद्द करण्यात आल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सकाळी आणि संध्याकाळी विरार, बोरिवली, चर्चगेट, दादर, मुंबई सेंट्रल अशा स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली.
पश्चिम रेल्वे ब्लॉक कालावधीत कांदिवली आणि बोरीवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेसाठी अभियांत्रिकी, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित महत्त्वाची कामे केली जात आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरीवली-विरार सारख्या गर्दीच्या स्थानकांवर हेल्प डेस्क सुरु केले असून यामाध्यमातून प्रवाशांची मदत करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेवर १८ जानेवारी २०२६ पर्यंत ब्लॉक राहाणार आहे. ब्लॉक कालावधी वाढवला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक लोकल रद्द होऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होईल.
अतिरिक्त बससेवा द्या!
पश्चिम रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरीवली ते चर्चगेट दिशा तसेच बोरीवली ते विरार दिशेस अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून देण्याची विनंती पश्चिम रेल्वेकडून करण्यात आली आहे. दरम्यान बेस्ट प्रशासनाकडून कोणत्या मार्गावर किती अतिरिक्त बस सोडल्या याची माहिती देण्यात आलेली नाही.