बापरे! ५८ कोटींची डिजिटल अरेस्ट; सर्वांत मोठी फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 09:18 IST2025-10-17T09:17:53+5:302025-10-17T09:18:03+5:30
कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने विविध बोगस खात्यांवर पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडण्यात आले.

बापरे! ५८ कोटींची डिजिटल अरेस्ट; सर्वांत मोठी फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत ७२ वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची ५८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वांत मोठी ऑनलाइन फसवणूक ठरली असून, याआधीच्या गुन्ह्यांमध्ये २० ते २३ कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे.
तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे ७२ वर्षीय व्यावसायिक आहेत. १९ ऑगस्ट रोजी सायबर भामट्यांनी तक्रारदाराला सक्तवसुली संचलनालाय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवले. मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवण्याची भीती दाखविण्यात आली. ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत भामट्यांनी वृद्धाला आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवली. सीबीआय आणि ईडी अधिकारी असल्याचे भासवत, या व्यक्तीस आभासी अटकेत ठेवले.
कारवाईची भीती दाखवून त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने विविध बोगस खात्यांवर पैसे ट्रान्स्फर करण्यास भाग पाडण्यात आले. वृद्ध व्यक्तीने आजीवन मिळवलेली ५८ कोटींची रक्कम फसवणूक करणाऱ्यांच्या खात्यात भरली. फसवणूक लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. एकूण १८ खात्यात पैसे वर्ग करण्यात आले होते. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.