हे समिंदर देवा, हामश्यावर कृपा ठेव...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 11:20 IST2025-08-09T11:20:12+5:302025-08-09T11:20:55+5:30
वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहुल, कुलाबा येथील कोळीवाड्यांत शुक्रवारी सकाळपासूनच नारळी पौर्णिमेचा उत्साह होता.

हे समिंदर देवा, हामश्यावर कृपा ठेव...
मुंबई : ‘सोन्याचा नारळ वाहीन मी तुला, हे देवा तारू येऊ दे बंदराला. हे समिंदर देवा, हामश्यावर तुही कृपादृष्टी ठेव...’ अशी साद मुंबईतील कोळी बांधवांनी शुक्रवारी नारळी पौर्णिमेच्या दिवशी दर्या सागरला घातली. या सणाचे औचित्य साधत मुंबईतील कोळी बांधव दर्या किनारी पारंपरिक वेशात आले होते. नृत्यांसह वाजतगाजत निघालेल्या या मिरवणुकांमुळे कोळीवाड्यांत उत्साह, आनंद शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले.
वेसावे, मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारावी, माहुल, कुलाबा येथील कोळीवाड्यांत शुक्रवारी सकाळपासूनच नारळी पौर्णिमेचा उत्साह होता. बोटींना सजविण्यापासून मिरवणुकीची तयारी जोमात सुरू होती. पूजेसह दर्याला साद घालण्यासाठी कोळी महिला-पुरुषांची किनारी लगबग सुरू होती. अधून-मधून पावसाची बरसात होत असतानाही नारळी पौर्णिमेचा उत्साह वाढत होता. जसा जसा सूर्य अस्ताला येऊ लागला तसतसे समुद्र किनारे गर्दीने फुलत गेले.
पारंपरिक कोळीगीते, वाद्याच्या साथीने मिरवणुका
खारदांडा कोळीवाड्यातील सहा पाड्यांपैकी प्रत्येक पाड्यांतून सोन्याचा नारळ सजवून कोळीवाड्यांतून मिरवणुका निघाल्या. सर्व पाड्यांतील सोन्याचे सजवलेले नारळ गावातील श्री राम मंदिर व समुद्र किनारी असलेल्या श्री हरबा माऊली मंदिरात आणण्यात आले.
तेथे पूजा करून वाजतगाजत ते मिरवणुकीने बंदरावर आणण्यात आले. पारंपरिक कोळीगीते आणि वाद्याच्या साथीने या मिरवणुका निघाल्या, अशी माहिती खारदांडा कोळीवाडा गावठाण संघाचे सचिव मनोज कोळी यांनी दिली.
गल्लीगल्लीतून सोन्याचा नारळ
वेसावा कोळीवाड्यात गावातील प्रत्येक गल्लीतून सोन्याचा नारळ घेऊन समुद्राच्या दिशेने मिरवणुका निघाल्या. गावाच्या सामायिक दहीहंडी उत्सवाचा मान प्रत्येक गल्ली, विभागाला दर नऊ वर्षांनी मिळतो. यंदा २०२५ चा मान डोंगरीकर तरुण मंडळ या शतक महोत्सवी संस्थेला मिळाला आहे, अशी माहिती डोंगरीकर तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चिखले व सेक्रेटरी जितेंद्र चिंचय यांनी दिली.
नवीन मासेमारी हंगामात आर्थिकदृष्ट्या भरभराट व्हावी, अशी आशा बाळगत कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. कफ परेड, कुलाबा, वरळी, वर्सोवा, मढ तसेच राज्यातील सर्व सागरी जिल्ह्यांतील मच्छीमारांनी सागराला नारळ वाहत आपली पंरपरा जपली.
देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती
कोळी समाज आजही आपली शेकडो वर्षांची परंपरा असलेला मासेमारीचा व्यवसाय जपण्याचा प्रयत्न करीत आहे. सागरी नैसर्गिक साधन संपत्तीवर उपजीविका करणाऱ्या या समाजाने शुक्रवारी समुद्राला नारळ अर्पण करून दर्या माऊलीची पूजा केली.
राजहंस टपके, माजी अध्यक्ष, वेसावा कोळी जमात ट्रस्ट