Join us  

रॅगिंग केल्याप्रकरणी दादर पोलिसात गुन्हा , कॉलेज तरुणांना पाठवल्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 2:23 AM

दादरमधील एका महाविद्यालयातील तरुणीसोबत रॅगिंग करून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई : दादरमधील एका महाविद्यालयातील तरुणीसोबत रॅगिंग करून तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणीच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी ७ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटिसा पाठवल्या आहेत. त्यापैकी दोघांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.तक्रारदार तरुणी मुंबईतील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेते. आॅगस्ट महिन्यात कॉलेजमधून त्यांना असाइयनमेंट देण्यात आली होती. त्यासाठी काही ग्रुप तयार करण्यात आले होते. याच दरम्यान तिच्या ग्रुपमध्ये असलेल्या ७ आरोपींनी तिची रॅगिंग केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या सात आरोपींपैकी ६ जण तिच्यासोबत शिक्षण घेतात. तर एक जण एक वर्षाने ज्युनिअर आहे. या सात तरुणांनी तिचे व्हिडीओही व्हायरल करून बदनामी केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. तिने कॉलेजला जाणेही बंद केले होते.याबाबत तिच्या वडिलांना समजताच त्यांनी कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीकडे लेखी अर्जाद्वारे तक्रार केली. त्या तक्रार अर्जावरून समितीने स्वतंत्र चौकशी केली आणि याबाबतचा अहवाल दादर पोलिसांना दिला. त्यानुसार दादर पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सातही तरुणांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी नोटिसा पाठवल्या आहेत. त्यानुसार त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आतापर्यंत दोघांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळले. अन्य आरोपींचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी तरुणीच्या अन्य मित्र-मैत्रिणींकडेही चौकशी सुरू असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे एसीपी सुनील देशमुख यांनी दिली.

टॅग्स :पोलिसमुंबई पोलीसगुन्हाविद्यार्थी