ऑफर्स, सवलतींचा वर्षाव; दुकानांत ग्राहकांची झुंबड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:23 IST2025-10-20T11:23:11+5:302025-10-20T11:23:39+5:30
पारंपरिक, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मोठी मागणी

ऑफर्स, सवलतींचा वर्षाव; दुकानांत ग्राहकांची झुंबड
खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबईत सर्वत्र मंगलमय वातावरण आणि उत्साह दिसून येत आहे. दादर, क्रॉफर्ड मार्केट, मशीद बंदर, लालबाग-परळ, चेंबूर, वांद्रे, पार्ले आदी ठिकाणच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरश: झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. दुकानदारांनी दिलेल्या विविध सवलती आणि भेटवस्तूंच्या आकर्षक ऑफर्सचा त्यांनी लाभ घेतला.
यंदा पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या भेट वस्तूंचा ट्रेंड आहे. पर्यावरणपूरक वस्तूंना प्रचंड मागणी असून मातीचे दिवे, मातीच्या मूर्ती, सुगंधी कँडेल्स, सजावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. हस्तकलेच्या वस्तूंसह स्मार्टवॉच, ब्लू टूथ स्पीकर, स्मार्ट-लॅम्प, मोबाइल, टॅब यांची खरेदी झाल्याने बाजारात मोठी उलाढाल झाल्याचे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
खरेदी करताना यंदा अनेकांनी पारंपरिकतेसोबत आधुनिकता, पर्यावरणपूरकता आणि स्थानिक उद्योगांना साथ देण्याचा विचार केल्याचे दिसून आले.
ऑनलाइन खरेदीत वाढ
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही विविध वस्तूंवर मोठी सवलत मिळत असल्याने ऑनलाइन खरेदीचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढली आहे. विविध कंपन्यांनी आकर्षक सवलती दिल्याने त्याचा लाभ ग्राहक घेत आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कस्टमाइज्ड आणि वेलनेस हॅम्पर्सची मोठी विक्री होत आहे. वैयक्तिक फोटो, नाव किंवा संदेश असलेले ‘पर्सनलायझ्ड गिफ्ट्स’, तसेच हर्बल प्रॉडक्ट्स आणि स्पा किट्स यांना मोठी मागणी आहे.