लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह टिप्पणीबाबत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, तसेच कुणालचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारमधील स्टुडिओच्या केलेल्या तोडफोडप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा नोंदविला. अटक झालेल्या १२ जणांची वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. विधान परिषदेचे कामकाज गदारोळामुळे तीन वेळा तर विधानसभेचे कामकाज एक वेळा तहकूब करावे लागले. खार पोलिसांनी सोमवारी युवा सेनेचे सरचिटणीस राहुल कनाल तसेच ३० ते ४० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
सुपारीबाजांना सोडणार नाही : मुख्यमंत्री
कुणाल कामराने माझ्यावर, एकनाथ शिंदेंवर राजकीय व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ; पण, कोणी जर अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन बदनामी करीत असेल तर मात्र सोडणार नाही, त्याच्यावर नक्की कठोर कारवाई होणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
कामरा म्हणाला, कोर्टाने आदेश दिले तरच माफी मागेन : कथित आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल कुणाल कामरा याने, पोलिसांकडे माफी मागण्यास स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आपण फक्त न्यायालयाने आदेश दिले तरच माफी मागू अन्यथा नाही, असे प्रत्युत्तर कामराने दिल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी त्याच्याशी फोनद्वारे संपर्क साधला होता, असे समजते.
या कलमांतर्गत गुन्हा : कामरावर बीएनएस कायदा कलम ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक गैरवर्तन करणारे विधान) व ३५६(२) (बदनामी) नुसार गुन्हा दाखल झाला.
महापालिकेने स्टुडिओचे अनधिकृत शेड पाडले : महापालिकेच्या खार विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी हॉटेलममधील स्टुडिओची पाहणी केली. तेथे अनधिकृत शेड उभारल्याचे आढळले, ते पाडण्यात आले. तसेच स्टुडिओच्या जागेची मोजणी केली.