गणेश विसर्जनाच्या मार्गात अडथळा

By Admin | Updated: September 1, 2014 04:53 IST2014-09-01T04:53:00+5:302014-09-01T04:53:00+5:30

कोपर खैरणे गावातील ग्रामस्थांच्या पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनात विघ्न आणल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामस्थ मंडळाकडून खाडीमध्येच पारंपरिक पध्दतीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

The obstacle in the way of Ganesh immersion | गणेश विसर्जनाच्या मार्गात अडथळा

गणेश विसर्जनाच्या मार्गात अडथळा

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
कोपर खैरणे गावातील ग्रामस्थांच्या पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनात विघ्न आणल्याचा प्रकार घडला आहे. ग्रामस्थ मंडळाकडून खाडीमध्येच पारंपरिक पध्दतीने गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. यंदाही विसर्जनाची तयारी करण्यात आली असतानाच रात्री दगडांचा ढीग तेथे रचण्यात आला आहे.
कोपर खैरणे गावातील ग्रामस्थांकडून प्रतिवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन खाडीमध्येच केले जाते. पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार गौरी गणपती विसर्जनाच्या दिवशी तेथे मोठा उत्सव साजरा होत असतो. वाजत गाजत विसर्जनासाठी आणलेल्या गणेशमर्ती होडीने खाडीच्या मध्यभागी नेऊन त्यांचे विसर्जन केले जाते. या सोहळ्याकरीता कोपर खैरणे गावातील महिला, पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. यंदाही खाडीमध्येच गौरी गणपतीचे विसर्जन करण्याचा निर्णय कोपर खैरणे ग्रामस्थ मंडळाने घेतला आहे. त्यानुसार खाडी किनारी भागाची स्वच्छता करुन तेथील घाट विसर्जनासाठी सज्ज करण्यात आला होता. परंतु गौरी गणपतीचे विसर्जन अवघ्या चार दिवसांवर असतानाच ग्रामस्थांच्या उत्साहात विघ्न आले आहे.
ग्रामस्थांतर्फे विसर्जन होणाऱ्या खाडी किनारच्या जागेत शनिवारी मध्यरात्री दगड टाकण्यात आले आहेत. अज्ञात व्यक्तीकडून हा प्रकार झाला असून त्याबाबतचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ग्रामस्थांच्या उत्साहावर विरजण घालण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असल्याचा आरोप ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
महापालिकेने गावालगतच बनवलेल्या तलावात विसर्जन करताना महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. गतवर्षी तलावात गणेशमूर्ती विसर्जनासाठी काही ग्रामस्थ गेले असता त्यांना अनेक समस्या भेडसावल्याचे पाटील यांचे म्हणणे आहे. खाडीमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. हा निर्णय ग्रामस्थ मंडळाने महापालिका आणि पोलिसांना देखील कळवलेला आहे. अशातच अज्ञाताकडून विसर्जनाच्या ठिकाणी दगड टाकण्यात आल्यामुळे ग्रामस्थांपुढे विसर्जनात अडथळा निर्माण झाला आहे. तरीही खाडीतच गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी घेतला आहे.
ग्रामस्थांच्या स्वेच्छेच्या निर्णयात अडथळा आणू पाहणाऱ्यांना आव्हान देत सर्व ग्रामस्थ खाडीतच विसर्जन करणार असल्याचे ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस आत्माराम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या तलावांमध्येच ग्रामस्थांनी विसर्जन करावे असे आवाहन विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The obstacle in the way of Ganesh immersion