Join us
Daily Top 2Weekly Top 5

जनता जनार्दनाची काेराेनावर कृपा; राज्यात एका महिन्यात तीन हजार पटींनी वाढले रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 07:07 IST

ओ.. माय... क्रॉन... संक्रांतीच्या भेटीला

- स्नेहा मोरे मुंबई : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने उपचाराधीन रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या एका महिन्यात राज्यातील उपचाराधीन रुग्णांमध्ये तीन हजार पटींनी वाढ झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली.

राज्यात ८ डिसेंबर २०२१ रोजी ६ हजार २८६ उपचाराधीन रुग्णांची नोंद होती. यात वाढ होऊन एका महिन्यात ११ जानेवारी रोजी हे प्रमाण २ लाख २१ हजार ४७७ वर गेले आहे. म्हणजेच एका महिन्यात सुमारे ३ हजार ४२३.३४ टक्क्यांनी उपचाराधीन रुग्ण वाढल्याचे अहवालात नमूद आहे. १२ जानेवारीच्या अहवालानुसार, सध्या राज्यातील उपचाराधीन रुग्णसंख्येने २ लाख ४० हजारांचा टप्पा ओलांडला.

१५ ते २५ डिसेंबर दरम्यान राज्यात सक्रिय रुग्णसंख्या ६ ते ८ हजारांच्या घरात होती. मात्र २७ डिसेंबरला हे प्रमाण १० हजार ४४१ वर पोहोचले. तर ६ जानेवारी २०२२ ला या संख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडून १ लाख १४ हजार ८४७ वर गेला. राज्यातील वाढत्या उपचाराधीन रुग्णसंख्येत प्रमुख १० जिल्ह्यांचा समावेश आहे, त्यात मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर , नाशिक, नागपूर, सातारा, अहमदनगर आणि औरंगाबाद  यांचा समावेश आहे.

कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढता प्रसार लक्षात घेत प्रशासनाने मुंबईकरांना गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. पण संक्रांतीच्या खरेदीसाठी मुंबईकरांनी मात्र गुरुवारी दादर परिसरात खरेदीसाठी गर्दी केली होती. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. हा नियम मोडणाऱ्या ४३ लाख चार हजार ७८ नागरिकांकडून महापालिका आणि पोलिसांनी ८५ कोटी ५७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. मात्र कारवाईनंतरही विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेने अशा नागरिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करणे गरजेचे आहे.

ओमायक्रॉन रुग्णांचे निदान नाही

राज्यात गुरुवारी एकही नवीन ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. आजपर्यंत राज्यात एकूण १३६७ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण निदान झाले आहेत; त्यापैकी, ७७५ रुग्णांना त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस