NSS volunteers deliver video to citizens | एनएसएस स्वयंसेवकांनी व्हिडीओद्वारे दिला नागरिकांना संदेश

एनएसएस स्वयंसेवकांनी व्हिडीओद्वारे दिला नागरिकांना संदेश

रोहित नाईक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनचे पालन करत नागरिक सध्या आपापल्या घरांमध्येच थांबले आहेत. अनेक क्षेत्रांतील सेलिब्रेटीही नागरिकांना घरीच थांबण्याबाबत आवाहन करत आहेत. यामध्ये आता भर पडली आहे ती राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांची. सध्या सोशल मीडियावर एनएसएस स्वयंसेवकांचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तब्बल अकरा विविध भाषांमध्ये नागरिकांना सामाजिक संदेश देण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठीच सरकारने सर्वांना घरीच थांबण्याचे निर्देश देत लॉकडाउन जाहीर केले. मात्र तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरत असून यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. यासाठीच एनएसएस स्वयंसेवकांनी एका व्हिडीओद्वारे जनतेला घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मीरा रोडच्या  एल. आर. तिवारी इंजिनीयरिंग कॉलेजच्या एनएसएस विभागाच्या पुढाकाराने साकारलेल्या या व्हिडीओमध्ये मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू  प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, मुंबई विद्यापीठ एनएसएस संचालक सुधीर पुराणिक, एनएसएसचे विभागीय संचालक (महाराष्ट्र व गोवा सरकार) डी. कार्थिगेयन आणि एनएसएस राज्य संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे यांनीही सामाजिक संदेश दिला आहे.

कुलगुरू पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला आहे की, ‘विद्यार्थ्यांनो सध्या आपण आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत असून आपल्याला राज्य तसेच केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी घरीच थांबा. इंटरनेटवर आपल्या विषयांचे अनेक व्हिडीओ उपलब्ध असून त्याचा अभ्यास करा. आपल्यासह आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या.’
-------------------------

मालवणी भाषेतही संदेश
या व्हिडीओमध्ये खारेपाटण आटर््स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजच्या दिक्षिता बांदिवडेकरने मालवणी भाषेतून संदेश दिला आहे. याशिवाय अंकित दुबे (हिंदी), शुभम निकम (मराठी), राज पाल (बंगाली), यश द्विवेदी (हरयाणवी), कौशिक सोझियाचेट्टी (तमिळ), उन्नती बामानिया (गुजराती), डेल्सी डीसूझा (कोंकणी), अंजना नायर (मल्याळम्), दीप दवे (मारवाडी) व देबासिस नायक (ओरिया) यांनीही विविध भाषांमधून जनजागृती केली आहे. हे सर्व जण एल.आर. तिवारी कॉलेजचे विद्यार्थी आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NSS volunteers deliver video to citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.