आता हवी तितकी ‘पॉवर’ मिळणार, ४८ तासांतच विजेचा भार वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:05 IST2025-10-05T09:05:33+5:302025-10-05T09:05:45+5:30
उद्योग-व्यवसाय, घरगुती वापरासाठी तत्काळ वाढीव वीज उपलब्ध; महावितरण विभागाचा निर्णय

आता हवी तितकी ‘पॉवर’ मिळणार, ४८ तासांतच विजेचा भार वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घरगुती ग्राहक, औद्योगिक, व्यावसायिक आणि लघुदाब ग्राहकांना वाढीव वीज हवी असल्यास आता जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही. लघुदाब वर्गवारीतील वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा ठिकाणी ग्राहकांनी शुल्क भरल्यानंतर २४ ते ४८ तासांत मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर आणि कार्यान्वित केला जाईल.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसाठी घरगुती ग्राहक तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि इतर लघुदाब ग्राहक यांसाठी हा उपक्रम प्रामुख्याने उपयुक्त ठरेल. इतर ग्राहकांच्या १५७ किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी दिली जात आहे.
मोबाइलवर सुविधा
सध्या अस्तित्वात असलेल्या वीज जोडणीतील वीजभार करारापेक्षा वाढवणे किंवा कमी करण्याची सुविधा ग्राहकांना संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवर लॉगिन करून उपलब्ध आहे. पण मंजुरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्यामुळे त्यासाठी जास्त वेळ लागायचा.
स्वयंचलित कोटेशन
आता १५७ किलोवॅटपर्यंत वीजभार वाढीसाठी स्वयंचलित मंजुरी देण्यात येणार आहे.
वीजभार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदवल्यानंतर ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन दिले जाईल, तसेच कोटेशनचे शुल्क भरण्याचा पर्याय ऑनलाइन उपलब्ध असेल.
पायाभूत यंत्रणा
ज्या वीज जोडणीच्या करारापेक्षा वीजभार वाढविण्यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.
अशा ठिकाणी महावितरणद्वारे पायाभूत यंत्रणा उभारली
जाईल आणि याबाबत एजन्सीला सूचित केले जाईल.
वाढीव वीजभाराच्या गरजेनुसार किंवा सिंगल फेजऐवजी थ्री फेजची मागणी असल्यास नवीन मीटर लावण्यात येतो. अशा परिस्थितीत तसा आदेश स्वयंचलितरीत्या एजन्सीला दिला जाईल. त्यामुळे नवीन वीज मीटरची गरज असलेल्या ठिकाणी वीजभार वाढीची प्रक्रिया ४८ तासांत पूर्ण होईल.