आता रंग सांगणार, मेट्रो मार्गांची ओळख; मुंबईच्या सौंदर्यात भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 13:29 IST2025-08-03T13:28:47+5:302025-08-03T13:29:07+5:30
या उपक्रमांतर्गत मेट्रो मार्गाशी खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजविले जात आहेत. जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.

आता रंग सांगणार, मेट्रो मार्गांची ओळख; मुंबईच्या सौंदर्यात भर
मुंबई : मुंबईच्या सौंदर्यात भर पडावी आणि मेट्रो मार्गांची सहज ओळख व्हावी, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुशोभीकरण आणि सार्वजनिक सुविधा उपक्रमांत मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोच्या एकूण दोन हजार ९६२ खांबांपैकी दोन हजार ५३७ खांबांवर (८६ टक्के) रंगकाम पूर्ण केले आहे. उर्वरित खांबांचे काम पावसाळ्यानंतर पुन्हा सुरू होणार आहे.
या उपक्रमांतर्गत मेट्रो मार्गाशी खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजविले जात आहेत. जेणेकरून त्या मार्गाची ओळख स्पष्टपणे अधोरेखित होईल.
मेट्रोच्या खांबांचे सुशोभीकरण करण्याचा उपक्रम हा जागतिक दर्जाची सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्यासोबतच शहराचा चेहराही अधिक आकर्षक, देखणा आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
प्रत्येक प्रवास अधिक अर्थपूर्ण, आनंददायक आणि मुंबईच्या प्रगतीची व वैशिष्ट्यांची अनुभूती देणारा व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हा उपक्रम म्हणजे पायाभूत सुविधा उभारण्यासोबतच नागरिकांचे दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी बारकाव्यांवरही लक्ष केंद्रित करणाऱ्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
रंगानुसार आणि संकल्पनाधारित डिझाइन असलेल्या या खांबांमुळे प्रवाशांना मार्ग ओळखण्यासाठी मदत होईल. त्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सुलभ होईल आणि शहराच्या एकसंध, सुबक रचनेत भर पडेल. पावसाळ्या नंतर उर्वरित कामही पूर्ण केले जाईल.
डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए
मेट्रो मार्गनिहाय आढावा
मेट्रो २ ब : डी. एन.नगर - मंडाळे : ६५३ खांबांपैकी ६२३ खांबांवरील काम पूर्ण झाले.
मेट्रो ४ व ४ अ : वडाळा - कासारवडवली - गायमुख: १०२३ खांबांपैकी ८४१ खांब रंगविण्यात आले.
मेट्रो ५ : ठाणे - भिवंडी - कल्याण: ४८८ पैकी ४३० खांबांवर रंगकाम करण्यात आले.
मेट्रो ६ : स्वामी समर्थनगर - विक्रोळी: ४२२ पैकी २८८ खांबांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले.
मेट्रो ९ : दहिसर (पूर्व) - मीरा-भाईंदर: ३५४ खांबांपैकी ३२८ खांब रंगविण्यात आले.
मेट्रो ७ अ : अंधेरी (पूर्व) - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ : सर्व २२ खांब रंगविण्यात आले.