महापालिकेच्या कारवाईनंतर क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 16:46 IST2019-09-03T16:44:49+5:302019-09-03T16:46:12+5:30

गेल्या महिन्यात पायाने गाजर धुण्याचा 'व्हिडीओ' झाला होता 'व्हायरल'

Now use the machine to wash carrots in Kranti Singh Nana Patil Mandai after BMC take Action | महापालिकेच्या कारवाईनंतर क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर

महापालिकेच्या कारवाईनंतर क्रांतिसिंह नाना पाटील मंडईत गाजर धुण्यासाठी आता यंत्राचा वापर

मुंबई : दादर पश्चिम परिसरातील महापालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधील विक्रेत्यांद्वारे / कामगारांद्वारे पायाने गाजर धुतले असल्याचा 'व्हिडीओ' १२ ऑगस्ट २०१९ रोजी 'व्हायरल' झाला होता. यानंतर महापालिकेद्वारे करण्यात आलेली कारवाई आणि गाळेधारकांच्या विशेष बैठका घेऊन केलेले आवाहन व साधलेला संवादाचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. क्रातिसिंह नान पाटील मंडईतील गाळेधारकांनी स्वत:हून पुढाकार घेत गाजरे धुण्यासाठी साधेसोपे व वैशिष्ट्यपूर्ण यंत्र तयार केले असून त्याचा वापरही दैनंदिन स्वरुपात सुरु केला आहे.

अशाच प्रकारच्या यंत्रांचा वापर महापालिकेच्या इतरही मंडयांमध्ये व्हावा, यासाठी संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वारंवार सूचना देऊनही गाजरे इत्यादी यथायोग्य प्रकारे न धुणा-यांवर महापालिकेद्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बाजार खात्याच्या सहाय्यक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली आहे. महापालिकेच्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमध्ये पायांनी गाजरे धुतली जात असल्याचा 'व्हिडीओ' गेल्या महिन्यात 'व्हायरल' झाल्यानंतर सदर घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेच्या बाजार खात्याद्वारे दोषींवर तात्काळ कारवाई केली होती. या अंतर्गत १४ गाळेधारकांवर नोटीस बजावण्यासह ११ गाळेधारकांना प्रत्येकी रुपये १ हजार दंड ठोठावण्यात आला होता. तर पायाने गाजर धुताना वापरण्यात आलेले २० ड्रमदेखील महापालिकेच्या पथकाद्वारे तात्काळ जप्त करण्यात आले होते. या कारवाई पाठोपाठ महापालिका मंडयांमधील गाळेधारकांच्या विशेष बैठका घेण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये गाजर इत्यादी धुण्यासाठी पायाचा वापर केल्यास महापालिकेद्वारे कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

तसेच गाजर इत्यादी धुण्यासाठी एखादे यंत्र वगैरे वापरता येईल का? याची चाचपणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.
महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधील गाळेधारकांनी स्वत:हून पुढाकार घेऊन एक अतिशय साधेसोपे पण वैशिष्ट्यपूर्ण यंत्र तयार केले असून त्याचा वापर देखील दैनंदिन स्वरुपात सुरु केला आहे, अशीही महिती सहाय्यक आयुक्त डॉ. हसनाळे यांनी दिली आहे.

Web Title: Now use the machine to wash carrots in Kranti Singh Nana Patil Mandai after BMC take Action