Join us  

हल्ली बारामतीवरुन पोपटाची स्क्रीप्ट येतेय, मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 3:05 PM

बारामतीला पोपटाची कमी पडली, की ते नवीन शोधून काढतात. त्यांना जे बोलता येत नाही, ते या पोपटाच्या तोंडून बोलतात.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भाषणातचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना, राज ठाकरेंची स्क्रीप्ट हल्ली बारामतीमधून येते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुंबईतील भाजपच्या महिला मेळाव्यात बोलतान मुख्यमंत्र्यांनी राज यांची खिल्ली उडवली. 

बारामतीला पोपटाची कमी पडली, की ते नवीन शोधून काढतात. त्यांना जे बोलता येत नाही, ते या पोपटाच्या तोंडून बोलतात. ज्यांना एक नगरसेवक निवडूण आणता येत नाही, येत आमदार निवडूण आणता येत नाही, एक खासदार निवडूण आणता येत नाही. एखाद्या टीममध्ये नॉन प्लेईंग कॅप्टन असतो. हे नॉन प्लेईंग कॅप्टनही नाही अन् बारावा गडीही नाही. त्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतलीय, त्या सुपारीनुरुप ते भाषणं करत राहतील. पण, त्यांच्या भाषणाने कुणीही विचलीत होणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंना सुपारी घेणारा नेता असं म्हटल्याचं दिसून येतं.  

मोदीजी सुर्यासारखे असून त्यांच्यावर थुंकणाऱ्याच्याच अंगावर ती थुंकी पडते. मोदींच्या नेतृत्वात 4 वर्षात मुंबई सुधारतेय, मुंबईतील गरीब, झोपडपट्टीतील माणसाचाही विकास होत आहे. आज प्रत्येक गरीबाला घराची चावी देण्याचं काम होतंय. संपूर्ण महाराष्ट्र बदलतोय, भारत बदलतोय हे आपण लक्षात ठेवायला हवं. भाजपा महाराष्ट्रात 45 जागा जिंकून दाखवले, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी बोलून दाखवला. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपवर जबरी टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुलवामा हल्ला आणि एअर स्ट्राईकच्या मुद्द्यावरुनही घेरण्याचा प्रयत्न राज यांनी केला होता.  

टॅग्स :राज ठाकरेदेवेंद्र फडणवीसमुंबईनरेंद्र मोदी