आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 20:08 IST2025-11-24T20:07:15+5:302025-11-24T20:08:21+5:30
बिबट्याचे मुंबईत संभाव्य हल्ले रोखण्यासाठी आमदार सुनील प्रभू यांचा वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र...

आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
आता मुंबईतहीबिबट्याची दहशत असून दिंडीशी गोरेगाव (पूर्व) भागात बिबट्याचा संचार पुन्हा सुरू झाला आहे. दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील न्यू दिंडोशी रॉयल हिल्स सोसायटीमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री अपरात्री बिबट्याचा वावर पाहायला मिळत असून हा कॅमेरातसुद्धा कैद झाला आहे. त्यामुळे संभाव्य बिबट्याचे हल्ले आणि जीवितहानी रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र उद्धव सेनेचे नेते, आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना पाठवले आहे.
या भागात म्हाडाच्या परवानगीने दि,२६ मे रोजी संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. मात्र ६ फूट उंचीच्या या जाळ्या ओलांडून बिबट्या सोसायटीमध्ये येत असल्याने येथील नागरिकांची झोप उडाली आहे.
या ठिकाणी ७७ न्यू दिंडोशी रॉयल हिल्सचे रो हाऊस असून परिसरात म्हाडाच्या १ ते २८ इमारतीत सुमारे १०००० नागरिक येथील म्हाडा वसाहतीत राहतात.बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षितेचे वातावरण पसरल्याचे आ. सुनील प्रभू यांनी मंत्री गणेश नाईक यांच्या निदर्शनास आणले.