...आता वेध अकरावी प्रवेशाचे; शिक्षण विभागाची हेल्पलाइन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 02:51 IST2025-05-15T02:50:08+5:302025-05-15T02:51:05+5:30
कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार, १९ मेपासून सुरू होणार दुसरा टप्पा, विद्यार्थ्यांना लॉगीन करण्याची मुभा

...आता वेध अकरावी प्रवेशाचे; शिक्षण विभागाची हेल्पलाइन सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालकांची आता अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. चांगल्या महाविद्यालयात, कोणत्या शाखेमध्ये प्रवेश मिळेल, याची चौकशीदेखील सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयाने आता हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. दरम्यान, अकरावी प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी १५ मे रोजी संपणार असून, त्यानंतर १९ मेपासून प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे.
११ वी प्रवेशासाठीच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेत कनिष्ठ महाविद्यालय नोंदणीबरोबरच विद्यार्थ्यांनाही प्राथमिक नोंदणी करणे शक्य होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर मोबाइल क्रमांक, ई-मेल आधारे प्राथमिक माहिती भरून ओटीपीद्वारे आपले खाते लॉगिन करून ठेवता येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रियेत विद्यार्थ्यांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार आहे.
अकरावीसाठी ऑनलाइन प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे डोमिसाइल प्रमाणपत्र, सर्व कागदपत्रे साक्षांकित करून त्याचे व्यवस्थित फोटो काढून त्याचे पीडीएफ आणि जेपीजी स्वरूपात फाइल अपलोड करावी लागणार आहे. ऑफलाइन पद्धतीतदेखील ही कागदपत्रे तयार ठेवावी लागतील. घरापासून महाविद्यालयाचे अंतर, पाल्याची आवड, त्याला मिळालेले गुण याचा सारासार विचार करून महाविद्यालय आणि अकरावीची शाखा निवडावी, असे ज्येष्ठ समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील २११ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवलेले आहेत. विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमास पसंती दिल्यास आवश्यक मनुष्यबळ नक्कीच निर्माण होईल आणि त्यानुसार या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीसुद्धा प्राप्त होतील. - सुदाम कुंभार, निवृत्त मुख्याध्यापक तथा समुपदेशक.
विविध शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य आणि इतर कर्मचारी वर्गाचे प्रशिक्षण झाल्यानंतर नोंदणी पडताळणी सध्या सुरू आहे. ही नोंदणी प्रक्रिया १५ मे रोजी संपल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येईल. - मुश्ताक शेख, शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई.