Join us

आता विद्यार्थी वर्गातच करणार शेती ; १०२ पालिका शाळांमध्ये फुलणार मळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 09:48 IST

मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे आणि शेती करण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे.

मुंबई : मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे आणि शेती करण्याचे प्रशिक्षण मिळणार आहे. त्यामुळे आगामी काळात पालिका शाळांच्या आवारात भाज्या-फळे यांचे पीक तरारलेले दिसेल. शहरी शेतीचा प्रयोग यापूर्वी पालिकेच्या दोन  शाळांमध्ये राबवण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी  झाल्यानंतर आता १०२ शाळांमध्ये या प्रयोगाचा विस्तार केला जाणार आहे.

या उपक्रमासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. चार निविदाकारानी त्यास प्रतिसाद दिला आहे. छतावरील शेतीच्या प्रयोगासाठी निवडलेल्या संस्थाच्या   मदतीने विद्यार्थ्यांना भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण दिले जाईल. 

सुरुवातीला १०२ शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल, त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. मुंबईत पालिकेच्या ४७९ शालेय इमारती आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या  निधीतून या उपक्रमासाठी एक कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे.

नैसर्गिक, सेंद्रियची होणार ओळख :

 पालिकेच्या शिक्षण विभागाने माटुंग्यातील एल. के. वाघजी केंब्रिज शाळा आही चेंबूर कालेकतर कॉलनीतील शाळेत छतावरील शेतीचे प्रशिक्षण देण्यात आले. मुलांनी त्या ठिकाणी विविध प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड केली. 

 या भाज्यांचा वापर मुलांच्या माध्यान्ह भोजनात केला जातो. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नैसर्गिक आणि सेंद्रिय  शेतीची  संकल्पना समजावून सांगितली जाते. 

 शहरातील मुलांचे गावाकडे जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तेही पेक्षा त्यांचा आणि शेतीचा फारसा संबंध राहिलेला नाही. त्यांना शेतीचा परिचय नाही. हा परिचय व्हावा, शेतीची ओळख व्हावी यादृष्टीने हा उपक्रम राबवला जात आहे. 

टॅग्स :नगर पालिकाशाळा