आता विधान परिषदेची संधी खुणावतेय, उद्धवसेना-शिंदेसेना महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 07:58 IST2026-03-27T07:56:32+5:302026-03-27T07:58:56+5:30
विधान परिषदेवरील नऊ आमदारांची मुदत संपत असल्याने यावरून राजकारण तापल्याचे चित्र आहे.

आता विधान परिषदेची संधी खुणावतेय, उद्धवसेना-शिंदेसेना महिला पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या चार वर्षांत दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष फुटल्याने विधानसभेत ज्यांची संधी हुकली त्यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार होण्याची एक संधी उपलब्ध होते. अशात परिषदेवरील नऊ आमदारांची मुदत १३ मे २०२६ रोजी संपत असल्याने यावरून राजकारण तापल्याचे चित्र आहे. उद्धवसेना व शिंदेसेनेतील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून जुंपली असून, आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे.
उद्धवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी शिंदेसेनेच्या नेत्या व विधान परिषद उपसभापती नीलम गोहे आणि शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांना डिवचले. शिंदेसेनेकडून चौथ्या-पाचव्या फळीतील महिलेची (ज्योती वाघमारे) वर्णी राज्यसभेवर लागली, याचा संदर्भदेत विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी गोन्हे आणि म्हात्रे जोमाने कामाला लागल्याचे अंधारे म्हणाल्या.
महाविकास आघाडीला एकच जागा?
शीतल म्हात्रे यांनी 'उद्धव ठाकरे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या जागेवर जाण्यासाठी 'मातोश्री'च्या मॅडमची किती चापलूसी कराल?' असा टोला लगावला. 'खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची रिक्त होणारी राज्यसभेची जागा घेण्याचा डाव फसला, आता थेट उद्धव ठाकरे यांच्या जागेवर डोळा आहे की काय?' असा सवाल करत 'खासदार-आमदार व्हायची स्वप्ने आता सोडून द्या,' असा खोचक सल्लाही दिला.
विधान परिषदेतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत आहे. त्यामुळे या नऊ जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीत विधानसभेतील २८६ आमदार मतदान करणार असून संख्याबळ पाहता महाविकास आघाडीसाठी केवळ एकच जागा मिळू शकते, अशी चर्चा आहे.