Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंनी घेतलं शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'चं नाव, 'खुपते तिथे गुप्ते'मधून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 14:52 IST

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर केला होता.

मुंबई - गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १० वर्षांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम सुरु होत असून याच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला होता. आता, या कार्यक्रमाचा ट्रेलरही समोर आलाय. यात, राज ठाकरे यांनी त्यांच्या फटाकेबाजीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. तर, आता ट्रेलरमध्ये थेट शरद पवारांनाच लक्ष्य केलंय. 

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा लेक पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला होता. आता या कार्यक्रमातील आणखी काही भाग प्रदर्शित झाला आहे. त्यात, राज ठाकरे यांनी थेट शरद पवारांवरच हल्लाबोल केला आहे. 

या मुलाखतीत अवधुत गुप्ते यांनी एका बॉक्समधून काही गिफ्ट दाखवत राज ठाकरेंना प्रश्न विचारले आहेत. त्यामध्ये, पहिल्यांदा त्यांनी चश्मा हे गिफ्ट राज ठाकरेंना दिलं, व हे कोणाला द्यायला आवडेल, असा प्रश्न राज ठाकरेंना केला. त्यावर, एक चश्मा पुरणार नाही. तुम्हाला मला अनेक चश्मे द्यावे लागतील, कारण, प्रत्येक राजकीय पक्षाला एक-एक गिफ्ट द्यावे लागेल, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिलं. त्यानंतर, अवधुत गुप्ते यांनी आपल्या बॉक्समधून गाजर हे गिफ्ट बाहेर काढलं, हे कोणाला द्यायला आवडेल असा प्रश्न केला. त्यावर, राज ठाकरेंनी हे सिल्व्हर ओकवर पाठवा, असे म्हणत थेट शरद पवार यांच्यावरच बोचरी टीका केलीय. सिल्व्हर ओकला आत्तातरी कोणी गाजर दाखवू शकत नाही, तेच सगळ्यांना गाजर दाखवतात, असे राज यांनी म्हटले. तसेच, भाजपच्या कार्यालयातही पाठवलं तरी चालेल, असेही राज यांनी म्हटले. 

अजित पवारांनाही केलंय लक्ष्य 

खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर राज ठाकरे यांना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अजित पवार, राज ठाकरेंविषयी भाष्य करत आहेत. . “एकदा पक्षामधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडून आणले. पण, सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले,” असं अजित पवार म्हणतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर राज ठाकरे यांनीही त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

“ए गप रे…असं मी म्हणणार होतो,” असं म्हणत ” अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होईल?,” असा खोचक सवाल विचार राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, हा कार्यक्रम ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज ठाकरेंप्रमाणेच लवकरच या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या शोची उत्सुकता आता दिवसेंदिवस वाढत आहे.

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमुंबईराज ठाकरेअवधुत गुप्ते