आता राणीच्या बागेत पाहा देश-विदेशातील साप; नवीन सर्पालयासाठी आराखडा होणार अंतिम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:53 IST2025-10-08T09:53:10+5:302025-10-08T09:53:18+5:30
सध्या त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून त्याच्या कडून आराखडा आणि अंदाजित खर्च याची प्रक्रिया अंतिम करण्यात येत आहे.

आता राणीच्या बागेत पाहा देश-विदेशातील साप; नवीन सर्पालयासाठी आराखडा होणार अंतिम
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत विदेशी सापांची ‘एन्ट्री’ होणार असून, त्यासाठी खास सर्पालय तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने नुकताच हिरवा कंदीलही दाखविला.
सध्या त्यासाठी सल्लागार नेमण्यात आला असून त्याच्या कडून आराखडा आणि अंदाजित खर्च याची प्रक्रिया अंतिम करण्यात येत आहे. येत्या २० दिवसांमध्ये त्याची छाननी होऊन, प्रशासनाकडून मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राणीच्या बागेत वाघ, पेंग्विनसारख्या प्राणी दाखल झाल्याने पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे दरवर्षी सुमारे १० कोटींच्या आसपास महसूल जमा होतो.
आता पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे सर्पालय तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी स्वदेशी प्रजातीच्या सापांसोबतच आता विदेशी प्रजातींचे साप पर्यटकांना पाहता येणार आहेत. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे.
ट्रिंकेत संके, जॉन बॉ साप
सध्या पाणघोडा असलेल्या ठिकाणाच्या विरोधी बाजूला सर्प निवास आहे. ते तोडून नव्याने सर्पालय उभारण्यात येईल. तेथे ट्रिंकेत संके, जॉन बॉ, रेड सॅड बॉ, व्हितकेर बॉ, रसेल वायपर, कॉमन इंडियन क्रेट, रॉक पायथोन, चेकड किलबॅक, इंडियन कोब्रा बँडेड क्रेट, मॉनिटर लिझार्ड या विदेशी प्रजातींसह अजगर, धामण पाहता येतील.
१६ हजार ८०० चौरस फूट जागेत नवीन प्रकल्प
नवीन सर्पालय १६,८०० चौरस फूट जागेवर तयार करण्यात येणार आहे. तेथे सापाच्या गरजेनुसार आवश्यक तापमान असेल. यातील काही सापांना अतिशय शीत वातावरण लागते, तर काही सापांना दमट वातावरणाची आवश्यकता असते. काही प्रजातींना उष्ण, तर काही प्रजातींना समशीतोष्ण वातावरण लागते. त्या पद्धतीने हे सर्पालय तयार करण्यात येणार आहे.
सर्पालयाचा खर्च अद्याप निश्चित झाला नसून सल्लागाराकडून आराखडा तयार झाल्यानंतर त्यासंदर्भात निविदा मागवण्यात येणार आहेत. नवीन सर्पालय हे प्राणीसंग्रहालयाचा आकर्षण बिंदू ठरू शकेल, अशी अपेक्षा प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाला आहे.