Join us

'आता राजसाहेबांनी भावाची समजूत काढायला पाहिजे'; अवधुत गुप्तेंनी सांगितली मनातील गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 20:37 IST

गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते सध्या त्यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमामुळे चर्चेत आहे.

मुंबई- गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते सध्या त्यांच्या 'खुपते तिथे गुप्ते' या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. सध्या अवधूत गुप्ते यांची एका युट्युब चॅनेलने मुलाखत घेतली आहे, या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास उलघडला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भातही त्यांच मत व्यक्त केलं आहे.

तू कोणत्या राजकीय पक्षात आहेस? अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत 

यावेळी मुलाखतीमध्ये अवधूत गुप्ते यांना तुम्हाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संदर्भात कोणत्या गोष्टी खुपतात असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्याने त्याच्या मनातील गोष्ट सांगितली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

अवधूत गुप्ते म्हणाले,   'मला राज साहेबांचं असं खुपतय, खरं तर मलाच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्राला खुपतय, माझं त्यांच्यावरचं प्रेम सिद्ध झालय आता त्यामुळे मी थेट सांगू शकतो की महाराष्ट्राला त्यांचं काय खुपतय. जे झालं ते झालं पण आता भावाची समजूत काढायला हरकत नाही. भावाजवळ जायला पाहिजे.प्रेम यात्रा आणि एकत्र यायला पाहिजे दोन भावांनी हे मला खुपतय' गुप्ते यांच्या उत्तराने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे. 

अवधूत गुप्तेनं बोलून दाखवली मनातील खंत

गायक, दिग्दर्शक आणि निर्माता अवधूत गुप्ते सध्या राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेत असल्याने चांगलाच चर्चेत आहे. खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवधुत गुप्ते राजकीय दिग्गजांच्या मुलाखती घेत आहे. विशेष म्हणजे या मुलाखतींची सुरुवातच त्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या मुलाखतीने केली होती. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नारायण राणे, संजय राऊत यांच्याही मुलाखती घेतल्या. त्यामुळे, अवधुत गुप्तेंचा कार्यक्रमही चांगलाच चर्चेत आहे. मात्र, आता अवधुतने एका मुलाखतीत राजकीय पक्षाबद्दल भाष्य केलं आहे.  

अवधुत गुप्तेला राजकीय प्रवेश आणि राजकीय पक्षाबद्दल विचारणा करण्यात आली होती. तू कोणत्या पक्षात आहेस? असा प्रश्न अवधूतला विचारण्यात आला होता. त्यावर, त्याने स्पष्टपणे सांगितले. ''खरं तर आम्ही कलाकार म्हटल्यानंतर आम्हाला कोणताही पक्ष नाही, असं म्हटलं जातं. पण आम्ही काय वेडे आहोत का? आम्ही काय आंधळे आहोत का? आम्हाला दिसत नाही, ऐकायला येत नाही का? आम्हाला सगळं दिसतं. आमच्या मनामध्ये एक पक्ष असतो, फक्त आमच्या कामामुळे तो पक्ष आम्हाला लोकांसमोर आणून ठेवता येत नाही. आम्ही कुठल्यातरी पक्षाचे असतोच, पण ते आम्ही जाहीरपणे सांगू शकत नाही'', असे म्हणत अवधुत गुप्तेनं मनातील खंत बोलून दाखवली. यावेळी, अवधुतने डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीचं उदाहरण दिलं, डॉक्टर कधी पक्षाचा बोर्ड लावत नाहीत, असे अवधुत म्हणाला. मात्र, आम्हीही मनाने एखाद्या राजकीय पक्षात असतो, असेही त्याने म्हटले.