- नितीन जगतापमुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर २०१९ मध्ये घडलेल्या जीवघेण्या अपघातांपैकी ५० टक्के दुर्घटना वाहनांना पाठीमागून धडक होऊन झाल्या आहेत. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी विश्रांती न घेणे आणि डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे हे आहे. यावर उपाय म्हणून आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. यामुळे वाहनांना पाठीमागून धडक बसून होणारे अपघात कमी होतील. देशात हा प्रयोग पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे.
एमएसआरडीसी, महामार्ग पोलीस, सेव्ह लाइफ फाउंडेशनने या नव्या तंत्रज्ञानासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत अधिक माहिती देताना महामार्ग पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक जास्त आहे. या मार्गावर तीन मार्गिका असून त्या वाहनांसाठी पुरेशा आहेत. पण अनेक चालक डाव्या बाजूने फोर्थ लेन किंवा पांढऱ्या रंगाची एजलाइन असते त्यावरून गाडी चालवितात. तसेच वाहनांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात त्या वेळी अपघात घडतो.
काही चालकांना रात्रीच्या वेळी थकवा येतो, त्यांना झोप लागते. चालक रोड सोडून डाव्या बाजूने पांढºया पट्टीवर जातात, त्यामुळे अपघात घडतात. ते रोखण्यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ‘टॅक्टटाइल एजलाइन’ तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर विदेशात होत होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेइतके मोठे रोड शोल्डर देशात इतर रस्त्यांवर नाहीत. त्यामुळे भारतात हा प्रयोग पहिल्यांदा राबविण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, वाहनचालकांनीही डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नये. पांढºया पट्टीचा वापर विशेष प्रसंगातच करावा. एखाद्या वाहनाला अपघात झाला असेल तर त्या ठिकाणी थांबावे. त्याचा लेनप्रमाणे वापर करू नये. थकवा आला असेल तर विश्रांतीसाठी त्याचा वापर करू नये. अवजड वाहनांसाठी खालापूर येथे विशेष व्यवस्था आहे. तेथे विश्रांतीगृह आणि नाश्त्याची व्यवस्था आहे. तर लहान वाहनांना रस्त्यात हॉटेल आणि मॉल आहेत तेथे चालकांना विश्रांती घेता येईल, असेही ते म्हणाले.