Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी ऐका; घरात बसा आणि कोरोनाला हरवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 18:58 IST

कोरोनाला हरविण्यासाठी पुन्हा बंद

 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोना संसर्ग वाढतच आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न केले जात आहे. मात्र अद्यापही म्हणावे तसे यश आलेले नाही. परिणामी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी वारंवार मुंंबईकरांना घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र काही ठिकाणी लॉकडाऊन पायदळी तुडविले जात आहे; आणि नागरिक  क्षुल्लक कारणे देत घराबाहेर पडत आहे. विशेषत: मुंबईच्या मध्यभागी असलेल्या एल वॉर्डात म्हणजे कुर्ल्यात हे प्रमाण अधिक असून, येथील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे यास आळा घालायाचा असेल कुर्लेकरांनो घराबाहेर पडू नका; नाही तर कुर्ल्याचा वरळी कोळीवाडा होईल, असे म्हणत कुर्लेकरांना घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, कुर्ल्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारसह रविवारी पुन्हा एकदा कुर्ला बंदची हाक येथील लोकप्रतिनिधींकडून देण्यात आली आहे.वरळी कोळीवाडा, भायखळा आणि धारावी येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून, आता कुर्ल्यातदेखील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. परिणामी कुर्ल्यातील तरुण मित्र मंडळे, स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून येथील नागरिकांना सातत्याने घरात बसण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र येथील नागरिक सातत्याने घराबाहेर पडत आहे. कधी भाजीच्या नावाखाली, कधी मेडीकलच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. कधी सोसायटीबाहेर, चाळीबाहेर, नाक्यावर तर कधी गच्चीवर नाहक गर्दी करत आहे. याहून महत्त्वाचे म्हणजे कुर्ला पूर्वेकडील नेहरू नगर येथील बाजारपेठेत तर कधी नव्हे तेवढी गर्दी आहे. येथील बाजारपेठेत मोठी दुकाने आहेत. येथील होलसेल दुकानांमध्ये कुर्ला, धारावी, सायन, चेंबूर अशा लगतच्या परिसरातील नागरिक खरेदीसाठी येतात. कुर्ला पूर्वेकडील नेहरू नगर येथील बस स्टेशनकडे येणा-या रस्त्यावरील गर्दी पाहून तर ही रोजची गर्दी आहे की काय? असा प्रश्न पडल्यावाचून राहणार आहे. दरम्यान, येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या संपर्क साधाला असता त्यांनी सांगितले की, येथे नागरिक रस्त्यावर गर्दी करत आहेत; ही वस्तुस्थिती आहे. येथे बाजारपेठ असल्याने लगतच्या परिसरातील नागरिक येथे खरेदीसाठी येत आहेत. मात्र येथील गर्दीवर नियंत्रण असावे. किंवा येथील रस्त्यांवर गर्दी करू नये त्यावर नियंत्रण मिळविता यावे; यासाठी नेहरू नगर पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवारसह रविवारी कुर्ला बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी बंदमध्ये सह•ाागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ कुर्लाच नव्हे तर मुंबई आणि सर्वच ठिकाणी कोरोनाचा समूळ नाश करण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करणे गरजेचे आहे, असेही मंगेश कुडाळकर यांनी सांगितले.दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडेदेखील फार काही वेगळी स्थिती नाही. कुर्ला रेल्वे स्थानकालगतचा रस्ता, लाल बहादूर शास्त्री मार्ग, हलाव पूल, लगतचा मार्केट परिसर, बैलबाजार येथील बाजारपेठ, एम.एन. रोड, वाडीया इस्टेट, क्रांतीनगर, संदेश नगर, काजुपाडा, कमानी, जरीमरी आणि साकीनाका येथील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने केले जात आहे, अशी माहिती मनसेचे येथील नगरसेवक संजय तुर्डे यांनी दिली. कोरोनाला हरविण्यासाठी घरातच बसणे आवश्यक असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह प्रत्येकाची काळजी घ्यावी. परिसरात स्वच्छता राखावी, असे आवाहन केले जात असेही तुर्डे यांनी सांगितले.---------------------------आपआपला परिसर स्वच्छ ठेवा; लॉकडाऊन पाळा- सायनपासून कुर्ला डेपोपर्यंतच्या मिठी नदी किनारी मोठया प्रमाणावर झोपड्या वसल्या आहेत. येथील लाल बहादूर शास्त्री मार्गालगत मोठया प्रमाणावर चाळी वसल्या आहेत.- कुर्ला रेल्वे स्थानकालगत मोठया इमारती, जुन्या चाळी आहेत. विद्याविहार रेल्वे स्थानकालगत वस्ती कमी असली तरी मोठया प्रमाणावर चाळी आहेत. येथे ख्रिश्चन गावात मोठया प्रमाणावर चाळी आहेत.- विमान तळाशेजारी संदेश नगर आणि क्रांतीनगरमध्ये झोपड्या आणि चाळी आहेत. वाडीया इस्टेट परिसरात जुन्या चाळी आणि इमारती आहेत-  जरीमरी येथे मोठया प्रमाणावर झोपडया आहेत. काजुपाडा येथे मोठया प्रमाणावर चाळी आहेत. साकीनाका येथ चाळी आणि झोपड्या आहेत. असल्फा येथे देखील मोठया प्रमाणावर झोपड्या आहेत.- भांडुप आणि मुलुंड येथे मोठया प्रमाणावर चाळी आहेत. यातील बहुतांश झोपड्या, चाळी या डोंगर उतारावर वसलेल्या आहेत.- मानखुर्द, गोवंडी, चेंबूर, चुनाभट्टी येथे चाळी कमी असून, झोपड्या मोठया प्रमाणावर आहेत. चाळी, झोपड्या, इमारती काही असले तरी येथील प्रत्येक जण कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.---------------------------- आपल्या घरातील ५ वषार्पेक्षा लहान मुलांना, ६० वषार्पेक्षा अधिक असलेल्या जेष्ठ नागरिकांना व इतर कोणतेही आजार म्हणजेच डायबेटीस, दमा, ब्लड प्रेशर, हृदयासंबंधी आजार असलेल्यांना घराबाहेर न पाठवावे ही विनंती.- आपणही घराबाहेर पडू नये. आपणांस कोणतेही अडचण येत असल्यास आम्हाला, प्रशासनाला व पोलिसांना संपर्क  करू शकता, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.- आपण सर्वांना मिळून ह्या कोरोना रोगाला हारवायचे आहे, ही जिद्द आपल्या  मनात असायला हवी.- आपण आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्या. घरी रहा, स्वस्थ रहा व सुरक्षित रहा.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई