लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईपोलिस आयुक्त म्हणून देवेन भारती यांची नियुक्ती झाल्यानंतर विशेष पोलिस आयुक्त पदाचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, गृहविभागाने मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त या पदाची श्रेणी कमी करून त्या ऐवजी सहपोलिस आयुक्त (गुप्तवार्ता/इंटेलिजन्स) असे नवे पद निर्माण केले. मुंबई पोलिस दलातील हे सहावे सहआयुक्त पद असून, महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी आता आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सध्या मुंबई पोलिस दलात कायदा व सुव्यवस्था, गुन्हे, प्रशासन, आर्थिक गुन्हे आणि वाहतूक या विभागांचे पाच सहपोलिस आयुक्त आहेत. यापूर्वी सर्व अधिकारी विशेष पोलिस आयुक्तांना कामाचा अहवाल सुपुर्द करायचे. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्तांमार्फत मुंबई पोलिस आयुक्त सर्व कामांचा आढावा घ्यायचे. भारती यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने हे पद रिक्त झाले. मात्र, या नव्या पदाच्या निर्मितीमुळे विशेष आयुक्त पद आपोआप रद्द झाले.
सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य
पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईतील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. अशावेळी शहर, संवेदनशील ठिकाणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून गोपनीय माहिती मिळविणे, सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या माहितीचे सूक्ष्म पर्यवेक्षण करण्यासाठी या पदाबाबत शासन विचाराधीन होते. त्यासाठी विशेष आयुक्त पदाची अतिरिक्त महासंचालक ही श्रेणी विशेष पोलिस महानिरीक्षक अशी करण्यात आली. या पदाचे सहआयुक्त (गुप्तवार्ता), असे नामकरण केल्याचे या आदेशात नमूद आहे. पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली त्यांचे कामकाज चालणार आहे. या नव्या पदावर कोणाची वर्णी लागते? याबाबतच्या चर्चांनाही रात्री गृहविभागाच्या आदेशाने पूर्णविराम लागला आहे. डॉ. आरती सिंह यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत डॉ. आरती सिंह?
गडचिरोली, नाशिक, मालेगाव, अमरावती, मुंबई सारख्या विविध ठिकाणी उल्लेखनीय आणि धडाकेबाज कामगिरी बजावत त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्याच्या प्रशासन विभागाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कामगिरीची दखल घेत अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना काळात त्यांचा मालेगाव पॅटर्न यशस्वी ठरला होता. मुंबईसह राज्यभरात महत्त्वाच्या गुन्ह्याच्या तपासात त्यांचा सहभाग होता. बदलापूर शाळेतील बलात्कार प्रकरण तपासाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीच्या त्या प्रमुख होत्या.
काय असेल जबाबदारी?
- गुप्तवार्ता यंत्रणेचे बळकटीकरण व प्राप्त गुप्तवार्ताचे निरंतर सूक्ष्म पर्यवेक्षण.- महत्त्वाच्या स्थळांची सुरक्षा व्यवस्था, व्हीआयपी सुरक्षा.- भारतासह अन्य राष्ट्रांचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे आदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या मुंबई भेटीदरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी.- गोपनीय माहितीवर आधारित हालचालींवर करडी नजर ठेवणे.