Join us  

आता एकाच कार्डवर करा ‘बेस्ट’ प्रवास; मोनो, मेट्रो, रेल्वेतही प्रवासाची सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 9:45 AM

प्रवाशांच्या वेळेत बचत तसेच तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी कॉमन कार्डची सुविधा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे.

मुंबई : चलो ॲप आणि सुपर सेव्हर योजनेद्वारे मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून चर्चेत असलेले ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ देखील लवकर सुरू होणार आहे. या कार्डमुळे प्रवासी बेस्ट बसगाड्यांबरोबरच रेल्वे, मोनो आणि मेट्रोद्वारेही प्रवास करू शकणार आहेत. 

बेस्ट प्रशासनाने प्रवाशांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. चलो ॲपद्वारे बसची अचूक वेळ कळत आहे, ७२ प्रकारच्या सुपर सेव्हर योजनेमुळे प्रवासीभाड्यात बचत होत आहे. तर पुढील दोन महिन्यांत बेस्ट बसमध्ये आरक्षण करणेही शक्य होणार आहे. मात्र, एकाच कार्डवर सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याची मुभा देणाऱ्या योजनेबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. ऑक्टोबरपासून २०२० या कार्डची चाचणी सुरू होती. 

प्रवाशांच्या वेळेत बचत तसेच तिकीट, पास काढताना रोख रकमेचा व्यवहार टाळण्यासाठी कॉमन कार्डची सुविधा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. या कार्डद्वारे प्रवाशाला तिकिटाचे पैसे द्यावे लागणार आहेत. हे कार्ड रिचार्ज करता येणार आहे. ही सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेत बेस्ट प्रशासनाचा बँकेबरोबर करार होणार आहे. डेबिट कार्डप्रमाणेच या कार्डचा वापर अन्य देयके भरण्यासाठी करता येईल. 

सव्वा पाच लाख प्रवाशांकडे ‘चलो’ ॲप पाच लाख २५ हजार प्रवाशांनी चलो ॲप डाऊनलोड केले आहे. त्यातील दीड लाख प्रवासी या ॲप व स्मार्ट कार्डद्वारे बेस्ट तिकीट पास घेऊन बसमध्ये प्रवास करतात. चलो ॲप युनिव्हर्सल पासशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणाऱ्या प्रवाशांना मोबाईलवरून पास दाखवून प्रवास करता येतो. दैनंदिन तिकीट आणि पासमध्ये बचत करणाऱ्या ७२ प्रकारच्या नव्या योजना आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी आपल्याला हव्या असलेल्या फेरीची निवड करून एका दिवसात दोन फेऱ्यांसाठी नऊ रुपये, तर चार फेऱ्यांसाठी १४ रुपये मोजणार आहे. एका दिवसाच्या योजनेपासून जास्तीत जास्त ८४ दिवसांपर्यंतच्या प्रवास योजनेचा यात समावेश आहे.

टॅग्स :बेस्टमोनो रेल्वेमेट्रो