वडाळा येथील अँटॉप हिल भागाताली दोस्ती एकर्स परिसरात रस्त्यावर बेकायदा उभ्या केलेल्या वाहनांमुळे या परिसरातील वाहतुकीला खीळ बसत होती. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारत सुमारे ६०० वाहने उचलून नेली आहेत. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत झाली आहे. शिवाय पादचाऱ्यांनाही फूटपाथवरुन चालणे सोपे झाले आहे.
अँटॉप हिल येथील हा भाग आधीच वाहतुकीचे गजबजलेला आहे. त्यात तेथे होणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे शेख मिसरी शाह दर्गा चौक ते आचार्य अत्रे नगर मोनोरेल स्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत होती. रस्त्यांसह तेथील फुटपाथवर दुचाकी आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे पालिका आणि वाहतूक पोलिसांनी मोहीम हाती घेतली. १५० पेक्षा जास्त दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांच्या मालकांना दंड ठोठावून त्यांना त्यांची वाहने घेऊन जाण्यास सांगण्यात आले ज्या वाहनांचे मालक हजर नव्हते, अशी वाहने वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतली, अशी माहिती पालिकेच्या एफ-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन शुक्ला यांनी दिली.