Join us
Daily Top 2Weekly Top 5

महिला प्रवाशांसाठी आता ‘बेस्ट’ न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 06:59 IST

तेजस्विनी बस तीन महिन्यांत धावणार, प्रस्तावाला बेस्ट समितीकडून मंजुरी

मुंबई : बसभाड्यात कपात केल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यामध्ये महिला प्रवाशांची संख्याही अधिक आहे. त्यांच्यासाठी ३७ तेजस्विनी या लेडीज स्पेशल मिडी बसगाड्या येत्या तीन महिन्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने मंगळवारी मंजुरी दिली.

रेल्वेमध्ये लेडीज स्पेशल गाड्या चालविण्यात येतात. त्याच धर्तीवर विशेष बेस्ट बसगाडी सुरू करण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. त्यानुसार तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मात्र ही बस ठरावीक वेळेलाच सोडण्यात येत असे. त्यामुळे दिवसभर ही सेवा सुरू ठेवण्याची मागणी होऊ लागली. ही मागणी मान्य करीत महाराष्ट्र शासनाच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून बेस्ट या बस घेणार आहे.

या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ११ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यानुसार ३७ मिडी बसगाड्या घेण्यात येणार आहेत. या बसगाड्या फक्त महिलांसाठीच दिवसभर चालविण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाच्या सेवेत असलेल्या महिला बस वाहक या बसमध्ये काम करतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अन्यथा पुरुष कर्मचारीच या बसचे वाहक म्हणून काम करतील.बेस्टच्या २६ आगारांमार्फत या बस चालविण्यात याव्यात, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बसगाड्यांचे वैशिष्ट्यया मिडी बसगाड्या डिझेलवर चालविण्यात येतील.एका बसची किंमत २९ लाख ५० हजार रुपये आहे.व्ही. ई. कंपनीच्या या ३७ बस ऑटोमेटिक आहेत.जास्त महिला प्रवासी असलेल्या मार्गांवर या बसेस चालविण्यात येतील.

टॅग्स :बेस्ट