मुंबई :मुलुंड येथील एलबीएस मार्गावर वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ च्या कामादरम्यान संरक्षक कठडा कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जाग आलेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) आता सर्व मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो ४ मार्गिकेची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अन्य मेट्रोंची तपासणीही सुरू केली जाणार आहे.
मेट्रो ४ मार्गिकेवर कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे संरक्षण कठडा कोसळून दुर्घटना झाली होती. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले होते. मेट्रो ४ मार्गिकेवरील अपघात घडलेल्या भागाचा कंत्राटदार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर-अस्टाल्डी जेव्ही आहे. त्यांनी हे काम उप कंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक या कंपनीला दिले आहे. त्यांच्याकडून कामादरम्यान गंभीर हलगर्जीपणा बाळगल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी एमएमआरडीएने कंत्राटदार आणि सल्लागारावर कारवाई केली आहे. तसेच पोलिसांनी गुन्हा नोंदवून घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक केली आहे. या घटनेनंतर आता एमएमआरडीएनेही मेट्रो ४ च्या संपूर्ण मार्गिकेची तपासणी सुरू केली असून, पुढील दोन दिवस ही तपासणी चालेल. त्यानंतर विशेष सघन सुरक्षा तपासणी पथकाकडून अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. त्या अहवालातील सूचनेनुसार एमएमआरडीएकडून पुढील कारवाई केली जाणार आहे.
मुंबई महानगरात सुमारे ३३७ किमी मेट्रोचे जाळे उभारले जाणार आहे. त्यातील १२१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांची कामे सध्या सुरू आहेत. यातील मेट्रो ९, मेट्रो ५ आणि मेट्रो ४ मार्गिकेवर गेल्या काही दिवसांत अपघात घडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
भविष्यातील घटना रोखणार भविष्यात पुन्हा अशा घटना
घडून जीवित अथवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रकल्पांची सुरक्षा तपासणी करण्यास सुरुवात केली
आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या सर्वच मेट्रो मार्गिकांच्या प्रकल्पस्थळी कामाची संपूर्ण
तपासणी केली जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यात त्रुटी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार आहे. आता तरी प्रकल्पांच्या कामावर एमएमआरडीएची करडी नजर राहील, अशी आशा व्यक्त होत आहे.
या मार्गिकांची कामे सुरू
सध्या एमएमआरडीएमार्फत डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ बी, वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४, कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, विक्रोळी ते स्वामी समर्थनगर मेट्रो ६, गुंदवली ते तरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ, दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो ९, कल्याण ते तळोजा मेट्रो १२ यांची कामे सुरू आहेत.
सल्लागाराला बजावल्या होत्या दीडशेपेक्षा अधिक नोटिसेस
मुंबई : वडाळा कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकेच्या सल्लागाराला मागील दोन ते अडीच वर्षांत तब्बल १५० हून अधिक नोटिसा बजावण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, एवढ्या नोटिसा बजावूनही सल्लागाराकडून कामात कुचराई केल्याचे स्पष्ट झाले असून, दुर्घटना घडण्यापूर्वीच त्याच्यावर का कारवाई केली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुलुंड येथे मेट्रोचा संरक्षण कठडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. हा कठडा वाहनावर पडून ही दुर्घटना घडली. दरम्यान, या प्रकल्पावरील सल्लागार हा कठडा बसविण्याच्या कामादरम्यान प्रकल्पस्थळी निगराणीसाठी थांबला नसल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे. त्यानंतर या मेट्रो मार्गिकेचा सल्लागार असलेल्या हिल इंटरनॅशनल, डी. बी. इंजिनिअरिंग अँड कन्सल्टिंग, लुईस बर्गर या कंपन्याच्या जेव्हीचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई एमएमआरडीएने केली आहे.
कामाच्या खर्चाची तपासणी करण्याचे महत्वाचे काम
कंत्राटदाराने कामाचा खर्च योग्यरीतीने सादर केला की नाही याची तपासणी सल्लागार करतो. दरम्यान, कामात कुचराई करणाऱ्या या सल्लागाराला दुर्घटनेच्या १५ दिवस आधीच नोटीस बजावण्यात आली होती, असेही समोर आले आहे. आता एमएमआरडीएने त्याचे कंत्राट रद्द केले असून, अन्य सल्लागाराची लवकरच नियुक्ती केली जाईल.
कंत्राटदार आणि सल्लागाराविरोधात यापूर्वीच पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तसेच घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदाराकडील चार कर्मचाऱ्यांना आणि सल्लागार कंपनीतील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. एमएमआरडीएने या घटनेला जबाबदार धरून अधीक्षक अभियंता अभिजित भिसिकर, कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे व उपअभियंता स्नेहल सावंत यांचे निलंबन केले आहे.
Web Summary : Following a fatal accident on the Wadala-Kasarvadavali Metro 4 line, MMRDA has ordered safety inspections across all Mumbai metro lines. Negligence was found, leading to contract terminations and arrests. Inspections are underway to prevent future incidents and ensure safety.
Web Summary : वडाला-कासारवडवली मेट्रो 4 लाइन पर हुई एक घातक दुर्घटना के बाद, एमएमआरडीए ने मुंबई की सभी मेट्रो लाइनों पर सुरक्षा निरीक्षण के आदेश दिए हैं। लापरवाही पाई गई, जिसके कारण अनुबंध समाप्त कर दिए गए और गिरफ्तारियां हुईं। भविष्य में घटनाओं को रोकने और सुरक्षा सुनिश्चित करने के लिए निरीक्षण जारी हैं।