आता वांद्र्यापर्यंत १५ डब्यांची धिमी लोकल; चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 12:25 IST2025-12-12T12:24:39+5:302025-12-12T12:25:37+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांमध्ये वांद्रेचाही समावेश आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालये, महत्त्वाच्या शासकीय इमारतींमुळे येथे दररोज ४ ते ५ लाख प्रवासी ये-जा करतात.

आता वांद्र्यापर्यंत १५ डब्यांची धिमी लोकल; चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम होणार
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या १५ डब्यांच्या धीम्या लोकल सेवा आता वांद्रे स्थानकापर्यंत धावण्यासाठी मार्ग मोकळा होत आहे. अंधेरी-वांद्रेदरम्यान असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ, खार रोड, वांद्रे या प्लॅटफॉर्मची लांबी १२ डब्यांच्या लोकल थांबवण्यापुरतीच मर्यादित आहे. त्यामुळे चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच विरार ते वांद्रे धिम्या मार्गावर मार्गावर १५ डब्यांच्या लोकल धावणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर सर्वाधिक वर्दळीच्या स्थानकांमध्ये वांद्रेचाही समावेश आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील कार्यालये, महत्त्वाच्या शासकीय इमारतींमुळे येथे दररोज ४ ते ५ लाख प्रवासी ये-जा करतात. ऐन गर्दीच्या वेळी या स्थानकातून प्रवास करणे कठीण होत असल्याने वारंवार १५ डब्यांच्या लोकलची मागणी होत आहे. ही बाब लक्षात घेत सोयीयुक्त प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाने १५ डब्यांची लोकल अंधेरीहून पुढे वांद्रेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. १२ डब्यांच्या लोकलमध्ये ३,५०४ जण प्रवास कतात. या गाडीला आणखी ३ डबे वाढवल्यास प्रवासी क्षमता २५ टक्क्यांनी वाढून ४,३८० जण प्रवासी करू शकणार आहेत.
सध्या २११ फेऱ्या
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या विरार-चर्चगेट मार्गावर १५ डब्यांच्या २११ फेऱ्या चालवल्या जातात. त्यापैकी विरार-अंधेरीदरम्यान ११२ फेऱ्या धीम्या मार्गावर धावतात.
प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास मिळावा, यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील आहे. लोकलची प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येत असून या चारही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे त्याचाच एक भाग आहे.
विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे