Join us  

मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना धाडल्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2020 8:44 PM

शांतता भंग केल्यास या नोटिशीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार ९ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. सरकारला नेमकी भीती वाटते की सरकारला पोटदुखी होते का? नेमकं काय ? असा सवाल महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबई - ९ फेब्रुवारीच्या मनसेच्या मोर्च्याआधी पोलिसांनीमनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा धाडल्याची माहिती मिळत आहे. काळाचौकी पोलिसांनी मनसे पदाधिकारी संतोष नलावडे आणि राजेश मोरे यांना आज भा. दं. वि. कलम १४९ अन्वये नोटीस पाठवली आहे. शांतता भंग केल्यास या नोटिशीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. मात्र, मोर्च्याला पोलिसांनी परवानगी दिली असून पोलिसांच्या नोटिसींची आता गरज काय?, सरकारला नेमकी भीती वाटते की सरकारला पोटदुखी होते का? नेमकं काय ? असा सवाल महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे. 

काळेवाडी, रामटेकडी आणि परळगाव येथे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या मनसेच्या महामोर्चानिमित्त चौकसभा घेण्यात येणार आहे. या आयोजित केलेल्या चौकसभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार किंवा गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा शक्यता नाकारता येत नाही. शांतात भंग होऊन कायदा व शांततेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास जबाबदार धरून आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे नमूद केलेली नोटीस धाडण्यात आली आहे. तसेच दादर परिसरात रविवारच्या मोर्चासाठी मनसेची जय्यत तयारी सुरु केली असून टेम्पोवर स्पीकर लावून प्रचार सुरु केला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवार ९ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता मनसेचा पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मोर्चा निघणार आहे. मोर्चासाठी मनसेकडून जय्यत तयारी केली आहे. तसेच, पोलिसांनी मनसेला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या नव्या मार्गावरुन मोर्चा नेण्यास परवानगी दिली आहे. याआधी मोर्चाचा मार्ग  भायखळा ते आझाद मैदान असा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र मुंबई पोलिसांनी भायखळ्यातून मोर्चा काढण्यास नकार दिल्याने हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. आम्ही शांततेनेच मोर्चा काढणार आहोत. मात्र, आमच्यावर मोर्च्याच्या दिवशी काही घातपात, हल्ला होईल तर त्यावर पोलिसांनी नजर ठेवावी असे किल्लेदार यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :मनसेनागरिकत्व सुधारणा विधेयकमोर्चापोलिस