रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस, चुकीचे वार्तांकन करून मुंबई पाेलिसांची बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 07:31 IST2020-10-31T06:25:09+5:302020-10-31T07:31:56+5:30
Republic TV News : गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची मागणी करण्यात येत आहे.

रिपब्लिक टीव्हीला पुन्हा बजावली नोटीस, चुकीचे वार्तांकन करून मुंबई पाेलिसांची बदनामी
मुंबई : राज्य शासन आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत चुकीचे वार्तांकन करून पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी रिपब्लिकच्या चार पत्रकार, संपादकांविरुद्ध एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत रिपब्लिकला पुन्हा नोटीस पाठवली आहेे.
गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीची मागणी करण्यात येत आहे. यात, वृत्त निवेदिका, वरिष्ठ साहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, रिपोर्टर/ संपादक सागरिका मित्रा, शावन सेन, कार्यकारी संपादक निरंजन नारायण स्वामी, संपादकीय कर्मचारी, न्यूज रूम प्रमुखाचा समावेश आहे. २३ ऑक्टोबर रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींची चौकशी करण्यात आली. यापैकी शिवानी गुप्ताकडे केलेल्या तपासात, त्यांच्या न्यूज रूममधील आय न्यूज नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट शिफ्ट इंचार्जमार्फत तसेच चॅनलच्या आउटपुट डेस्ककडून टेलिप्रॉम्पटरद्वारे प्रसिद्ध झालेला मजकूर वृत्तनिवेदिका म्हणून वाचून दाखविल्याचे सांगितले.
अद्याप प्रतिसाद नाही
अन्य आरोपींनी सांगितलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी रिपब्लिक प्रशासनाकडून फौजदारी कलम ९१ नुसार, गुरुवारी नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आवश्यक ती माहिती मागवलेली आहे. त्यामुळे आरोपींची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. याबाबत संबंधिताकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद आला नसल्याचेही थाेरात यांनी सांगितलेे.