Join us

रो-रो बोटीवर तसं काही घडलं नव्हतं; राज ठाकरेंना दंड झाल्याची बातमी चुकीची: मनसे

By बाळकृष्ण परब | Updated: September 22, 2020 08:18 IST

राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला.

मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने अलिबागला जाताना मास्क न घातल्याने त्यांना एक हजार रुपयांचा दंड करण्यात आल्याचे वृत्त काल चर्चेचा विषय ठरले होते. 'मुंबई मिरर'च्या बातमीवरून सर्व प्रसारमाध्यमांनी ही बातमी प्रकाशित केली होती. मात्र ही बातमी चुकीची असल्याचे स्पष्टीकरण मनसेकडून देण्यात आले आहे.राज ठाकरे कुटुंबासह शुक्रवारी मुंबईहून अलिबागला रवाना झाले होते. यावेळी त्यांनी मुंबई-मांडवा रो-रो फेरीने प्रवास केला. यावेळी रो-रो बोटीत प्रवाशांनी धुमप्रान करु नये आणि मास्क परिधान करावा, अशी उद्घोषणा केली जात होती. मात्र राज ठाकरे बोटीवरच्या मोकळ्या जागेत मास्क न परिधान करताच उभे होते. तसेच त्यांनी सिगारेटही पेटवली होती. या सर्व प्रकारानंतर बोटीवरील अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंना नियमांची माहिती दिली. यानंतर आपली चूक लक्षात येताच राज ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान न केल्यामुळे राज ठाकरेंनी १००० रुपयांचा दंड देखील भरला, असे वृत्त 'मुंबई मिरर'ने दिले होते.या घटनेप्रकरणी मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'या प्रवासात मी राज ठाकरेंसोबत होतो. त्यामुळे अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं मी ठामपणे सांगू शकतो,' असे सरदेसाईंनी मनसेकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामध्ये म्हटले आहे.याआधी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मंत्रालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र यावेळी राज ठाकरे यांचा अपवाद वगळता सर्वच जणांनी मास्क घातले होते. यानंतर तुम्ही फेस मास्क का लावला नाही, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर सगळ्यांनी मास्क घातलाय, म्हणून मी मास्क घातलेला नाही, असं उत्तर राज यांनी हसत हसत दिलं होतं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :राज ठाकरेमनसेमुंबईअलिबाग