Join us  

'ही' रामनिष्ठा नसून राजनिष्ठा, जमीन घोटाळ्यावरुन संजय राऊतांनी रोखठोक सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 11:07 AM

संजय राऊत यांनी द गॉल कोठे मिळणार, या मथळ्याखाली आपलं रोखठोक मत मांडलं आहे. दुष्मनांकडून पराभूत होऊनही ज्याने देशनिष्ठा सोडली नाही ते फ्रेंचचे द गॉल ! आज राजनिष्ठा, स्वामीनिष्ठेपुढे देशभक्तीचे महत्त्व उरले नाही.

ठळक मुद्देसंजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले

मुंबई - अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमीन खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केला आहे. त्यानंतर, भाजपा समर्थक आणि विरोधकांमध्ये सोशल मीडियावर चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक नेते आमने-सामने आले आहेत. भाजपा समर्थकांकडून घोटाळ्याबाबत बोलणाऱ्यांना देशद्रोही असल्याचं म्हटलं जात आहे. त्यावरुनच, खासदार संजय राऊत यांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. 

संजय राऊत यांनी, द गॉल कोठे मिळणार, या मथळ्याखाली आपलं रोखठोक मत मांडलं आहे. दुष्मनांकडून पराभूत होऊनही ज्याने देशनिष्ठा सोडली नाही ते फ्रेंचचे द गॉल ! आज राजनिष्ठा, स्वामीनिष्ठेपुढे देशभक्तीचे महत्त्व उरले नाही. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा, असे उदाहरण देत राऊत यांनी भाजपा नेते आणि समर्थकांना सुनावले.  

अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला 18 कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केल्याचं राऊत यांनी म्हटलं. 

संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही, असेही परखडपणे खासदार राऊत यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपाराम मंदिर