बहुमजली पार्किंग नव्हे; भंगार गाड्यांचे गोडाऊन...; पार्किंग लॉटकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 06:38 AM2024-01-25T06:38:46+5:302024-01-25T06:39:10+5:30

पार्किंग माफियांवर नियंत्रण मिळविण्यात एकीकडे महापालिका अपयशी ठरली असताना महापालिकेचे काही पार्किंग भंगार गाड्यांना आंदण दिल्याचे ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले आहे.

Not multi-storey parking; Godown of scrap cars...; Municipal Corporation's neglect of parking lot | बहुमजली पार्किंग नव्हे; भंगार गाड्यांचे गोडाऊन...; पार्किंग लॉटकडे महापालिकेचे दुर्लक्ष

बहुमजली पार्किंग नव्हे; भंगार गाड्यांचे गोडाऊन...; पार्किंग लॉटकडे महापालिकेचे दुर्लक्ष

- सीमा महांगडे

मुंबई : पार्किंग माफियांवर नियंत्रण मिळविण्यात एकीकडे महापालिका अपयशी ठरली असताना महापालिकेचे काही पार्किंग भंगार गाड्यांना आंदण दिल्याचे ‘लोकमत’च्या रिॲलिटी चेकमध्ये आढळले आहे. दादर, लोअर परळ भागातील खासगी इमारतीतील पार्किंगच्या जागा कचरा, भंगाराचे सामान आणि भंगार गाड्यांचे गोडाऊन झाल्या आहेत. मुंबईतील मध्यवर्ती भागात पार्किंगसाठी जागा मिळत नसताना येथील बकालपणा, प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हे बहुमजली पार्किंग अक्षरश: रिकामे असल्याची स्थिती आहे.

एकीकडे पार्किंगअभावी रस्त्यांच्या कडेला मुंबईत गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूककोंडी होते; मात्र, दुसरीकडे या बहुमजली पार्किंग संबंधित पार्किंग चालकांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ओस पडली आहेत. येथे कचरा, भंगार गाड्या, भंगाराचे सामान, फर्निचर यांचे साम्राज्य दिसते. संबंधित प्रतिनिधीने या सर्व ठिकाणची पाहणी केल्यानंतर भंगार गाड्या, धूळ आणि कचऱ्याशिवाय येथे काहीच दिसले नाही. अशा बकाल ठिकाणी नागरिक पार्किंगसाठी गाड्या आणतील कशाला, असा प्रश्न पडतो. मुंबईतील महत्त्वाच्या वाहनतळांवर भंगारात निघालेल्या रिक्षा, बसेस आणि जुन्या खराब झालेल्या गाड्या दिसून आल्या. पार्किंग चालकांच्या कर्मचाऱ्यांना या अव्यवस्थेशी काही देणेघेणे नसल्याचेच येथे दिसले. येथे कुठेही पुरेसा प्रकाश नव्हता. जागोजागी धूळ साचली होती.

क्षमता दीड हजार, गाड्या मात्र भंगार
लोअर परळ येथील लोढा पार्कमधील महानगरपालिकेच्या सार्वजनिक पार्किंगच्या जागेची क्षमता जवळपास दीड हजार वाहनांची आहे. मात्र, आतमध्ये प्रवेश केल्यानंतर वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या भंगार गाड्यांशिवाय येथे काहीच दिसत नाही. नागरिकांच्या मागणीनंतर येथे लिफ्ट बसविण्यात आली. मात्र, ती बंद पडलेली आहे. त्यामुळे अंधारातून जिन्याने मजले चढून जावे लागते. स्वच्छतेचाही अभाव आहे. पार्किंगच्या ठिकाणी गाड्या धुण्याची व्यवस्था केली आहे. तेथेच गाड्या पार्क होतात आणि तेथेच धुतल्याही जातात. त्यामुळे येथे काहीसा चिखल झाला आहे. वातावरण कोंदट असते.

तीन हजार वाहनांची क्षमता; मात्र पार्किंगच बंद

प्रभादेवी येथील ज्युपिटर मिल कम्पाउंड परिसरात वन इंडियाबुल सेंटरच्या जागेमध्ये पालिकेचे वाहनतळ आहे. तब्बल तीन हजार वाहने पार्क करण्याची या वाहनतळाची क्षमता आहे. मात्र, महानगरपालिकेचे सार्वजनिक वाहनतळ हे कित्येक महिने बंद असून, सुरक्षा रक्षकाकडे पालिकेचे काहीतरी काम सुरू असल्याच्या कारणाशिवाय इतर उत्तर नाही. ‘वन इंडियाबुल सेंटर’च्या मागील बाजूस रस्त्यात असणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्या आणि त्यांच्या जोडीला उभ्या असलेल्या वाहनांमुळे ना. म. जोशी मार्गाकडे जाताना इतर वाहनांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच अनेक गाड्या अनधिकृत पद्धतीने पार्क होत असल्याने या कोंडीत भर पडते.

रस्त्याच्या कडेला वाहने पार्क
मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वांत गजबजलेला परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर भागात तब्बल एक हजार वाहने एका वेळेस उभी करता येतील, असे हे वाहनतळ पालिकेला उपलब्ध झाले आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे त्याची दुर्दशा झाली आहे. या परिसरात शिवाजी पार्क, चैत्यभूमी, सिद्धिविनायक मंदिर, बड्या कंपन्यांची कार्यालये आहेत. येथे मोठ्या प्रमाणात लोक वाहने घेऊन येतात. ते रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करतात. हा पार्किंग लॉट मात्र रिकामाच आहे.

 अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही सुविधांची वानवा 
नोव्हेंबर २०२३ मध्ये कोहिनूरच्या स्क्वेअर पार्किंगच्या चौथ्या मजल्यावर आग लागली होती. त्यात १६ ते १७ गाड्या जळून पूर्णतः खाक झाल्या. कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन करून गाड्यांची पार्किंग केली जाते. त्यामुळेच ही आग लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याची चौकशी अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे. हीच अवस्था इतर वाहनतळांचीही आहे. अनेक ऑफ स्ट्रीट तसेच स्ट्रीट पार्किंगच्या ठिकाणी अनेकदा गाड्यांच्या शॉर्ट सर्किटमुळे आगी लागतात. मात्र, तेथे अग्निशमन यंत्रणा नाही.

 

Web Title: Not multi-storey parking; Godown of scrap cars...; Municipal Corporation's neglect of parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.