Join us  

उत्तर पश्चिममधून काँग्रेसच्या 36 इच्छुक उमेदवारांमध्ये चुरस; वर्सोव्यात सर्वाधिक उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 9:30 AM

काँग्रेस नेत्यांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

मनोहर कुंभेजकर

मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी उत्तर पश्चिम मधून काँग्रेसचे 36 इच्छुक असून  वर्सोवा विधानसभा मतदार संघातून सर्वात जास्त 14 इच्छुक आहेत. दादरच्या टिळक भवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज दि,31 रोजी सकाळी 11.30 वाजता उत्तर मध्य,दुपारी 1.30 वाजता उत्तर पश्चिम तर दुपारी 4.30 वाजता उत्तर पूर्व  या तीन लोकसभा मतदार संघातील 18 विधानसभा निहाय उमेदवारांच्या मुलाखती माणिकराव ठाकरे व हर्षवर्धन पाटील घेणार आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महायुतीच्या गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय निरुपम यांचा सुमारे अडीच लाखांहून अधिक मतांनी दारुण पराभव केला होता.त्यामुळे उत्तर पश्चिम मधून निवडून येण्याची क्षमता असलेले तगडे उमेदवार येथून दिले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली. 158 जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून काँगेसचे पदाधिकारी सुनील कुमरे, ताज मोहम्मद शेख, भरतकुमार सोळंकी,पुष्पा भोळे,सुनील चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.सुनील कुमरे हे आदिवासी सेलचे प्रदेश सचिव असून ते या सेलचे मुंबई अध्यक्ष आहेत. त्यांचे या भागात चांगले कार्य असून गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना ते कडवी लढत देऊ शकतात. त्यामुळे येथून त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी जोरदार चर्चा मतदार संघात आहे.

159 दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर दुबे,राजेंद्रप्रताप पांडे,संतोष सिंग,विरेंद्र सिंग,संदीप सिंग,राकेश यादव,प्रेमभाई गाला इच्छुक आहेत.येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांना टक्कर देण्यासाठी उत्तर भारतीय उमेदवार उभा करावा अशी चर्चा येथे आहे.

163 गोरेगाव विधानसभा मतदार संघातून राजेंद्र सिंग,श्रीमती किरण पटेल,माधवी राणे,प्रवीण नायक व सूर्यकांत मिश्रा हे इच्छुक आहेत. 164 वर्सोवा विधानसभा मतदार संघातून चक्क 14 काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.यामध्ये माजीे आमदार बलदेव खोसा,महेश मलिक,डॉ.सिद्धार्थ खोसा,रईस लष्करीया,चंगेज मुलतानी,मोहसिन हैदर,किरण कपूर,श्रीमती भावना जैन,अखिलेश यादव,इष्टीक जांगीरदार,झिशन सिद्धीकी,जावेद श्रॉफ,परमजीत गब्बर,अब्दुल खान यांचा समावेश आहे.

वर्सोवा येथून महेश मलिक,रईस लष्करिया,चंगेज मुलतानी,अँड.किरण कपूर,भावना जैन,माजी आमदार बलदेव खोसा यांची नावे चर्चेत आहेत.अँड.किरण कपूर हे गेली 45 वर्षे काँग्रेस मध्ये कार्यरत असून दिवंगत माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत यांना त्यांनी राजकरणात आणले होते,त्यामुळे त्यांचा विचार झाला पाहिजे असे मत सूत्रांनी व्यक्त केले. या दिग्गजांचे थेट दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी संपर्क असल्याने ते दिल्लीतून तिकीट मिळवू शकतात अशी कुजबुज उत्तर पश्चिम विधानसभेतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. सुमारे 2 लाख 97 हजार मतदार येथे असून सुमारे 1 लाख 5 हजार अल्पसंख्यांक या मतदार संघात आहेत.त्यामुळे अल्पसंख्यांक इच्छुकांना येथून तिकीट मिळाले पाहिजे अशी समाज बांधवांची इच्छा आहे.त्यामुळे चार वेळा आमदार पद भूषविलेले माजी आमदार बलदेव खोसा यांच्या ऐवजी भाजपाच्या स्थानिक आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची अल्पसंख्याक समाजात देखील जनसंपर्क असून त्यांना टक्कर देणारा अल्पसंख्याक चेहरा येथून उभा करावा अशी येथे चर्चा आहे.

165,अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अशोकभाऊ जाधव,मोहसिन हैदर व भरत कुमार सोळंकी यांचा समावेश आहे.भाजपाचे विद्यमान आमदार अमित साटम  यांचा मतदार संघातील असलेला आवाका लक्षात घेता त्यांच्या  विरोधात तिकीटासाठीअशोकभाऊ जाधव व मोहसिन हैदर यांच्यात चुरस आहे. 166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातून संदीप वाल्मिकी हा एकमेव इच्छुकांने अर्ज सादर केला आहे,मात्र माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी व माजी उपमहापौर राजेश शर्मा  यांची नावे या इच्छुकांच्या यादीत नसल्याचे समजते.

टॅग्स :काँग्रेसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019