उत्तर मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार; महापालिकेकडून मालाड परिसरात नवीन पूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:46 IST2025-10-01T13:45:14+5:302025-10-01T13:46:20+5:30
रस्त्यांसाठी २,२०० कोटींच्या निविदा प्रक्रिया सुरू

उत्तर मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार; महापालिकेकडून मालाड परिसरात नवीन पूल
मुंबई : उत्तर मुंबईतीलवाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिकेने काही पूल आणि रस्ते रुंदीकरण प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याचाच भाग म्हणून कोस्टल रोडला जोडणारा आणि मार्तेपर्यंत नेणारी पुलाची एक बाजू पालिका बांधकामासाठी नव्याने हाती घेत आहे. दुसरीकडे विविध प्रकल्पांसाठी २ हजार २०० कोटींच्या निविदा जारी केल्याने कोंडीला पूर्णविराम मिळणार आहे.
दरम्यान, आगामी कोस्टल रोड प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मीठ चौकी व एव्हरशाईन नगर भागातील वाहतूक व्यवस्थापनासाठी हे प्रकल्प महत्त्वाचे असल्याचे उत्तर मुंबईचे केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी सांगितले.
मालाड पश्चिम येथे उड्डाणपूल नसल्यामुळे कोंडी होत आहे. त्यावर उतारा म्हणून पालिकेने काही भागांत उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा भाग म्हणून रामचंद्र नाला जोडणारा पूल उभारण्यात येणार आहे. एमडीपी रोडपासून ते रायन इंटरनॅशनल स्कूल, मालाड मार्वे रोडपर्यंत या पुलाचे बांधकाम करण्यात येईल. तसेच मालाड पश्चिमेतील लगून रोडपासून इन्फिनिटी मॉलपर्यंत पूल बांधण्यात येणार आहे. याआधी पालिकेने या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली होती.
विस्तारित कोस्टल रोड प्रकल्पाचा एक भाग म्हणून कोस्टल रोडला मार्वे रोडशी जोडणारा नवीन ट्रॅफिक आर्म यात जोडण्यात आला. त्यामुळे या प्रकल्पांची नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात मंत्री पीयुष गोयल यांनी आवश्यक मंजुरीसाठी पाठपुरावा केला.
४२ महिन्यांत उभारणी
दोन्ही पूल ४२ महिन्यांत उभारण्यात येणार असून, सुरुवातीचे सहा महिने या पुलांच्या बांधकामाच्या पूर्वतयारीसाठी कंत्राटदाराला दिल्यामुळे उर्वरित ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. एका आर्थिक वर्षात हा खर्च करणे शक्य नसल्यामुळे २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक वर्षात या पुलासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
'एमसीझेडएमएस'ने दिली मान्यता
लगून रोड ते इन्फिनिटी मॉलपर्यंतच्या उड्डाणपुलास महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाची (एमसीझेडएमएसची) मान्यता मिळाल्याने उड्डाणपुलाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. मालाड, लिंक रोडहून मालवणी 3 येथे वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंक रोड विशेषतः मीठ चौकी सिग्नलवरील ट्रॅफिकमुळे तासनतास ताटकळत रहावे लागत असल्याने नागरिकांची फार मोठी गैरसोय होते. मात्र, आता यामुळे ही वाहतूककोंडी फुटणार अल्याने नागरिकांना दिलासा मिळेल.