Join us

“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 15:56 IST

Piyush Goyal News: येत्या काळात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. बोरिवली कोकण रेल्वेला जोडली जाणार असल्याचे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

Piyush Goyal News: विजय महायुतीचा, हा निर्धार जनतेचा, असा विश्वास व्यक्त करत उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पीयूष गोयल हे जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. उत्तर मतदारसंघातील अनेक ठिकाणी प्रचारफेरी, नमो रथ या माध्यमातून पीयूष गोयल शक्य तितक्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पीयूष गोयल यांनी देशाचा रेल्वे विभाग सांभाळला असून, अनेक गोष्टींची अंमलबजावणी केली होती. यातच आता कोकण रेल्वेलाबोरिवली जोडण्याचे काम लवकरच सुरू होईल, असे आश्वासन पीयूष गोयल यांनी दिले आहे. 

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात घरी जात असतात. मात्र, प्रतिवर्षी रेल्वेचे बुकिंग हा चाकरमान्यांसाठी कटकटीचा विषय असतो. शिवाय, मुंबईतील ठराविक स्थानकांवरून कोकणात जाणाऱ्या रेल्वे सुटत असल्याने तिथे पोहोचण्यासाठी प्रवाशांना धावपळ करावी लागते. त्यामुळे पश्चिम रेल्वे संबंधित उपनगरात राहणाऱ्या प्रवाशांसाठी बोरिवलीहून कोकणात जाता यावे, यासाठी लवकरच वाहतूक सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पीयूष गोयल यांनी भाष्य केले आहे.

बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार

बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरू करण्यात येईल, असे पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. येत्या काळात हार्बर रेल्वे बोरिवलीपर्यंत जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर बोरिवली कोकण रेल्वेला जोडली जाणार असल्याने उत्तर मुंबईकरांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याचे पीयूष गोयल म्हणाले. दहिसर येथील गावदेवी मंदिर येथून पीयूष गोयल यांच्या नमो यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रचार फेरीत सहभागी झाले. उपनगरात उत्तम दर्जाचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गोयल यांनी दिली. 

दरम्यान अनेक संस्था आणि संघटनांनी पीयूष गोयल यांना पाठिंबा जाहीर केल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गोपाळ शेट्टी, मनीषा चौधरी, मनसे तसेच शिवसेना शिंदे गटाचे मान्यवर पदाधिकारी पीयूष गोयल यांच्या प्रचारफेरीत सहभागी झाले. 

टॅग्स :पीयुष गोयलमुंबई उत्तरकोकण रेल्वेबोरिवलीमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४