Join us  

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 6:04 AM

महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ताकदीने मैदानात उतरा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे. बुधवारी त्यांनी उत्तर मुंबई आणि संभाजीनगर मतदारसंघांतील स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी या बैठकीत दर्शविण्यात आली. कोणत्याही मतदारसंघात कोणालाही उमेदवारी दिली तरी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ताकदीने मैदानात उतरा, अशा सूचना ठाकरे यांनी दिल्या.

उत्तर मुंबई मतदारसंघ भाजपचा प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी गोपाळ शेट्टी हे खासदार आहेत. त्याचबरोबर भाजप आमदारांचे प्राबल्यही याच मतदारसंघात आहे. त्यामुळे या जागी आपला उमेदवार देण्यापेक्षा काँग्रेसला ही जागा सोडल्यास त्याचा महाविकास आघाडीला फायदा असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली असून त्या ऐवजी विधानसभेसाठी मागाठणे, दहिसर मतदार संघ आपल्याकडे ठेवण्याचा विचार करण्यात आला आहे. मागाठण्यात मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सुर्वे हे शिवसेनेतून विजयी झाले. आता ते शिंदे गटात असल्याने या ठिकाणी ठाकरे गटाला आपला उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यासाठीच ही मागणी करण्यात आली आहे.छत्रपती संभाजीनगरमधून खैरेंना उमेदवारी?

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, जनतेचा कौल कोणाला याबाबत ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. दोन तास पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पदाधिकाऱ्यांनी यावेळी खैरेंच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. विशेष म्हणजे खैरे आणि दानवे यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेलोकसभामहाविकास आघाडी