उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत रंगणार

By सचिन लुंगसे | Published: June 17, 2023 06:52 AM2023-06-17T06:52:10+5:302023-06-17T06:52:51+5:30

नसीम खान, बाबा सिद्दिकी यांच्या नावांचीही चर्चा

North Central Mumbai Lok Sabha Constituency BJP vs Congress will be a direct fight | उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत रंगणार

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ: भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत रंगणार

googlenewsNext

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात पूर्वीपासून काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढत होत आली आहे. मोदी लाटेत भाजपच्या उमेदवार पूनम महाजन सलग दोन वेळा येथून निवडून आल्या आहेत. मात्र, नऊ वर्षांच्या कारकिर्दीत खा.पूनम महाजन या मतदार संघावर आपली म्हणावी तशी छाप पाडू शकलेल्या नाहीत. दुसरीकडे काँग्रेसच्या पराभूत उमेदवार प्रिया दत्त यांचीही मतदार संघाशी काही काळापासून नाळ तुटल्याने, यंदाच्या निवडणुकीत भाजपला टक्कर कोण देणार, असा प्रश्न आहे.

मुळात प्रिया दत्त आणि पूनम महाजन यांना कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी आहे. प्रिया दत्त यांचे वडील अभिनेते सुनील दत्त आणि पूनम महाजन यांचे वडील व भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या पुण्याईवर या दोन्ही उमेदवार आजवर निवडणुका लढवत आल्या आहेत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात अल्पसंख्याक मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हा फॅक्टर येथील उमेदवारासाठी खूप महत्त्वाचा आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांचे कार्ड अद्याप ओपन केले नसले, तरी या मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत रंगणार आहे. पूनम महाजन यांचा या मतदार संघात मोठा जनसंपर्क नसल्याचे भाजपचे कार्यकर्तेही खासगीत मान्य करतात, तर प्रिया दत्त या पराभूत झाल्यापासून चर्चेतच नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी काँग्रेस दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार, याबाबत उत्सुकता आहे. माजी मंत्री नसीम खान हे काँग्रेसचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या नावाचीही उमेदवार म्हणून चर्चा आहे.  

२०१९ मध्ये काय घडले?

  • पूनम महाजन यांनी ४ लाख ८६ हजार ६७२ मते मिळवित काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. प्रिया दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मते मिळाली होती.
  • २०१४ मध्ये काय घडले? पूनम महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मते मिळाली होती. त्यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. त्यांना २ लाख ९१ हजार ७६४ मते मिळाली होती.
  • २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये प्रिया दत्त यांनी पूनम महाजन यांना जोरदार टक्कर दिली होती. मात्र, त्यांना विजय प्राप्त करता आला नव्हता. २००९ मध्ये प्रिया दत्त यांना ३ लाख १९ हजार ३५२ मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे महेश जेठमलानी यांचा पराभव केला होता. जेठमलानी यांना १ लाख ४४ हजार ७९७ मते मिळाली होती. त्यावेळी मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांना १ लाख ३२ हजार ५४६ मते मिळाली होती.


कोणता मतदारसंघ, कोणाकडे?

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात विलेपार्ले येथे भाजपचे पराग अळवणी, चांदिवली येथे शिंदे गटाचे दिलीप लांडे, कुर्ला येथे शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर, कलिनामध्ये ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत. वांद्रे पूर्व मतदार संघात काँग्रेसचे झिशान सिद्दीकी, वांद्रे पश्चिममध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आमदार आहेत. विधानसभानिहाय विचार करता येथे भाजपचे दोन, शिंदे गटाचे दोन, एक शिवसेनेचा, तर एक काँग्रेसचा आमदार असे बलाबल आहे.

शिवसेनेची भूमिका काय?

  • उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करणार की नाही, याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. शिवसेनेचा या मतदार संघात एक आमदार आहेत.
  • वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचा कमी मताने पराभव झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडीने काँग्रेसचा उमेदवार दिल्यास त्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाची कशी साथ मिळते, त्यावरही बरेच गणित अवलंबून आहे.

Web Title: North Central Mumbai Lok Sabha Constituency BJP vs Congress will be a direct fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.