एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 09:39 PM2019-11-19T21:39:05+5:302019-11-19T21:39:15+5:30

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत.

Non-air-conditioned buses for ST passenger service | एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत दाखल

googlenewsNext

मुंबई: सर्वसामान्य प्रवाशांना खास लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी आधुनिक तंत्रज्ञान व अधिक सुखसोयींनी युक्त अशी विना वातानुकूलित (non ac) शयन-आसन (sleeper - sitter) व्यवस्था असलेल्या नवीन बसचा लोकार्पण सोहळा परळ बसस्थानकात सर्वसामान्य प्रवाशांच्या (रोहित धेंडे) हस्ते व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत परळ बस आगारात परेल-भटवाडी (पाटगांव ) ही बस सोडून संपन्न झाला.

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार व मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी ६७ लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते. त्यापैकी पहिल्या रातराणी बस सेवेचा प्रारंभ २० एप्रिल १९६८ रोजी जळगांव - पुणे या मार्गावर एसटी बस सुरु करून करण्यात आला. सध्या राज्यभरात २५६ मार्गावर ५१२ बसेसद्वारे रातराणी सेवा दिली जाते.

शयन-आसन व्यवस्था व तिकीट दर 

रात्रीचा लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशी शयन बसेसला प्राधान्य देतात. तसेच मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने ३० पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन  (बर्थ) असलेली बस चालनात आणली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) सध्या चालनात असलेल्या निम आराम म्हणजे हिरकणी बसच्या तिकीट दरा इतका असणार आहे. 

आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये 

१) सदर  बस १२ मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टील मध्ये बांधण्यात आली  आहे. त्यामुळे या वाहनामध्ये प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे.

२) लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये ३० आरामदायी पुश बॅक आसने व १५ शयन (बर्थ) आहेत.

३) सदर गाडीला हवेचा अवरोध कमी होण्यासाठी एरोडायन्यामिक आकार देण्यात आलेला असून पुढील व मागील शो आकर्षक एफआरपी मध्ये तयार केलेला आहे.

४) पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक बसविलेले आहेत.

५) चालक कॅबिनमध्ये अनाऊन्सिंग सिस्टीम बसविली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर बसविण्यात आलेला असून त्याचे बटण चालक कक्षात देण्यात आलेले आहे. 

६)पाठीमागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा बसविलेला असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात देण्यात आलेली आहे.

७) या बसमध्ये खालील बाजूस बसण्यासाठी आरामदायी पुश बॅक सीटस  देण्यात आलेले आहेत. सदर  सीट्स पाठीमागील बाजूस २५० एम एम पर्यंत पुश बॅक देण्यात आलेला आहे.

८) प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबईल ठेवण्यासाठी पाऊच दिलेला आहे. तसेच मॅगझीन पाऊच व पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी ब्रॅकेटची सुविधा देण्यात आली आहे. तसेच पर्स अडकिवण्यासाठी हुक दिलेला आहे.  

९) प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प या दोनही सुविधा एकत्र असलेले एलईडी लाईट बसविण्यात आलेले आहेत.

१०) प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन देण्यात आलेला आहे. 

११) हवेच्या दाबावर उघडझाप होणारा  प्रवासी दरवाजा बसविण्यात आलेला आहे.

१२) आपत्कालीन सुटकेसाठी गाडीच्या मागील बाजूस एक संकटकालीन दरवाजा तसेच पुढील उजव्या बाजूला प्रवासी आपत्कालीन  खिडकीची सुविधा देण्यात आलेली आहे. आपत्कालीन परिस्थिती मध्ये काचा फोडण्यासाठी पुरेसे हातोडे योग्य ठिकाणी बसविण्यात आलेले आहेत. 

१३) प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे सामान कक्षा तयार करण्यात आलेले आहेत. 

१४) आगीपासून सुरक्षितता मिळण्यासाठी वाहनामध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आहेत.

१५) पुरेशी हवा व प्रकाश येण्यासाठी वाहनाच्या खिडक्यांचा आकार १९०० मिलीमीटर ठेवण्यात आला आहे.

Web Title: Non-air-conditioned buses for ST passenger service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.