डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 05:30 IST2025-09-21T05:29:44+5:302025-09-21T05:30:07+5:30
भविष्यात १८ डब्यांच्या लोकलवर भर देण्याची तरतूद आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
मुंबई - मुंबईत पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल डिसेंबरपर्यंत येणार आहे. अपघातांमुळे दरवर्षी अनेक प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा लोकल धावणार आहेत. भविष्यात मुंबईतील सर्व लोकल टप्प्याटप्प्याने स्वयंचलित दरवाजाच्या असतील, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. बुलेट ट्रेनच्या घणसोली येथे शनिवारी झालेल्या कार्यक्रम स्थळी ते माध्यमांशी बोलत होते.
मुंब्रा येथे झालेल्या अपघातानंतर स्वयंचलित नॉन एसी लोकलच्या प्रकल्पाला गती मिळाली. रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाद्वारे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवणे, बंद-दरवाजांच्या डिझाइनचा वापर करून नवीन नॉन-एसी ट्रेन तयार करणे, तसेच एसी लोकल नैसर्गिकरीत्या बंद-दरवाजांच्या असतील. अधिकाऱ्यांच्या मते, गर्दीच्या वेळी एक लोकलमधून ४ हजारहून अधिक जण प्रवास करू शकतील, तर तिची क्षमता फक्त अडीच ते तीन हजार प्रवासी असते. अशा परिस्थितीत, बंद दरवाजे अपघात रोखू शकतात.
मुंबईत लोकल गाड्या १२ डब्यांच्या धावतात. त्यापैकी फक्त काही १५ डब्यांच्या आहेत. नवीन निविदेत १५ डब्यांच्या मोठ्या संख्येने गाड्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये भविष्यात १८ डब्यांच्या लोकलवर भर देण्याची तरतूद आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.
वंदे मेट्रो कोच या मेट्रोचा चेहरामोहरा बदलतील
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने अलीकडेच २,८५६ वंदे मेट्रो कोच खरेदीसाठी ई-निविदा जारी केली. या कोचची देखभालदेखील दीर्घकालीन कराराखाली केली जाईल. या कोचमध्ये मेट्रोसारखी वैशिष्ट्ये असतील. बंद दरवाजे, सुधारित वायुविजन, आरामदायी आसन व्यवस्था आणि सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान ही वैशिष्ट्ये आहेत.
आमचे प्राथमिक उद्दिष्ट हे प्रवाशांची सुरक्षा आहे. त्यामुळेच भविष्यातील सर्व गाड्या स्वयंचलित दरवाजाच्या असतील. - अश्विनी वैष्णव, रेल्वेमंत्री