टोलवाढीमुळे नाक्यांवर सकाळीच गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 02:20 IST2020-10-02T02:20:24+5:302020-10-02T02:20:48+5:30
दर वाढल्याबाबत अनेक जण अनभिज्ञ; पावती फाडताना व्यक्त केली नाराजी

टोलवाढीमुळे नाक्यांवर सकाळीच गोंधळ
मुंबई : नादुरुस्त रस्ते, त्यावर पडलेले खड्डे, वाहतूककोंडी आणि कोरोनाचा विळखा अशा अनेक समस्यांनी घेरलेल्या नागरिकांच्या मनस्तापात गुरुवारी झालेल्या टोलवाढीने भर घातली. भल्या पहाटेपासूनच नागरिकांना मुंबईत प्रवेश करताना वाढीव दराने टोल द्यावा लागल्याने नाराजीचा सूर होता. विशेषत: आजपासून टोलवाढ झाल्याचे अनेकांना माहीत नसल्याने नागरिकांनी पावती फाडताना गोंधळ घातला.
मुंबईच्या टोलनाक्यांवरील दरात १ आॅक्टोबरपासून पाच ते पंचवीस रुपयांची वाढ झाली. त्यानुसार, मुंबईत प्रवेश करताना मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग येथील टोलनाक्यांवर सकाळीच नागरिकांना वाढीव दराची पावती फाडावी लागली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर सर्वांसाठी लोकल सेवा बंद असल्याने सद्य:स्थितीत अनेकांना रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत आहे. खड्डे आणि वाहतूककोंडीची डोकेदुखी असताना टोलदर वाढविले जात आहेत; हे अन्यायकारक आहे, अशी नाराजी वाहनचालकांमध्ये होती. टोलचे दर वाढविले तरी रस्ते खड्डेमुक्त होणार का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
एमईपी कंपनीचे हे सर्व टोलनाके आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा विचार करता येथील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च २००२ ते २०२७ या २५ वर्षांच्या काळातील वसुलीसाठी नाक्यांवर टोल आकारला जातो.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यासोबत जो करार झाला आहे त्या कराराचा विचार करता येथील टोलच्या दरात दर तीन वर्षांनी वाढ केली जाते. त्यानुसार, १ आॅक्टोबर रोजी पुन्हा टोल दरात वाढ झाली.
टोलचे नवीन दर (") :
च्छोटी वाहने ३५ वरून ४०
च्मध्यम अवजड वाहने ५५ ऐवजी ६५
च् ट्रक आणि बसेस १०५ ऐवजी १३०
च्अवजड वाहने १३५ वरून १६०
च्मासिक पास १४०० रु पयांऐवजी १५०० रु पये झाला आहे.