नो वेटिंग लिस्ट, आता कन्फर्म तिकीट; पश्चिम रेल्वेवर तिकीट रद्दचे प्रमाण ४२ टक्क्यांनी घटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 05:41 IST2025-02-21T05:41:32+5:302025-02-21T05:41:49+5:30

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेने प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

No waiting list, now confirmed tickets; Ticket cancellation rate on Western Railway reduced by 42 percent | नो वेटिंग लिस्ट, आता कन्फर्म तिकीट; पश्चिम रेल्वेवर तिकीट रद्दचे प्रमाण ४२ टक्क्यांनी घटले

नो वेटिंग लिस्ट, आता कन्फर्म तिकीट; पश्चिम रेल्वेवर तिकीट रद्दचे प्रमाण ४२ टक्क्यांनी घटले

मुंबई : प्रवासासाठी रेल्वेचे रिझर्व्हेशन करताना प्रवाशाच्या मनात धाकधूक असते. रिझर्व्हेशन मिळालेच नाही तर वेटिंग लिस्टकडे लक्ष केंद्रित होते. वेटिंग लिस्टवरचा नंबर जसजसा कमी होत जातो, तसतशी त्याच्या रिझर्व्हेशनच्या निश्चितीची शक्यता बळावत जाते. नाहीच मिळाले रिझर्व्हेशन तर तिकीट रद्द होते. मात्र, आता ही साखळी तुटली असून, वेटिंग लिस्टवरील प्रवाशांच्या तिकीट रद्द होण्याच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. पश्चिम रेल्वेवर हे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत घटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेने प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या अंतर्गत स्लीपर आणि थर्ड एसी कोचमध्ये जास्त वेटिंग तिकीट दिले जात नाहीत. तसेच पूर्वी चार्ट तयार झाल्यावरही तिकीट खिडकीवरून खरेदी केलेल्या वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येत होती. मात्र, आता फक्त कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली जात असून, वेटिंगच्या प्रवाशांना खाली उतरवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना तिकिट कन्फर्म हाेईल की नाही, याची फारशी चिंता उरणार नाही.

पश्चिम रेल्वे, आपल्या प्रवाशांच्या आरामासाठी तसेच सुविधेसाठी वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, प्रतीक्षा यादीतील प्रवासी आरक्षित डब्यांमध्ये प्रवास करणार नाहीत याची खात्री करत आहे.

विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

वेटिंगचे प्रमाण कमी का झाले?

रेल्वेच्या काही गाड्यांमधील प्रतीक्षा यादीची मर्यादा कमी केली असून, आरक्षित डब्यातील वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करण्यावर बंदी घातल्याने हा बदल झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पश्चिम रेल्वेच्या स्लीपर क्लासमधील वेटिंग तिकीटधारकांची संख्या ६१ टक्क्यांनी, तर थर्ड एसीमधल्या वेटिंग प्रवाशांची संख्या २४ टक्क्यांनी कमी झाली आहे.

मध्य रेल्वेने वेटिंग तिकिटांची संख्या एकूण तिकीट विक्रीपेक्षा १० टक्क्यांनी कमी केली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वेकडूनही असा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे प्रतीक्षा तिकिटे उचित प्रमाणामध्ये जारी केली जात आहेत.

Web Title: No waiting list, now confirmed tickets; Ticket cancellation rate on Western Railway reduced by 42 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.